

राहू : पुढारी वृत्तसेवा : गूळनिर्मितीसाठी गुर्हाळघरावर गाळप होत असलेल्या उसाला प्रतिटन सुमारे 3 हजार ते 3 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. यंदाच्या हंगामामध्ये गुर्हाळघरावर उसाला मागणी वाढली आहे. सध्या गुळाच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आगामी काळामध्ये उसाचा प्रतिटन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गूळ सध्या 3 हजार 500 ते 3 हजार 900 रुपये क्विंटलच्या आसपास विकला जात असून, सरासरी गूळ उताराही वाढत आहे. दौंड तालुक्यामध्ये ऊस लागवडीच्या कमी झालेल्या प्रमाणामुळेही बाजारभाव वाढला आहे.
यंदा पावसाने दिलेल्या ओढीमुळे एकीकडे एकरी उत्पादन कमी होण्याची शेतकर्यांना भीती होती. मात्र, गुळाच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सध्या 3 हजार ते 3 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने गूळनिर्मितीसाठीच्या ऊसतोडीचे प्रमाण वाढले आहे. सध्या मिळत असलेला भाव समाधानकारक आहे. मात्र, फार जास्तही नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. पिकाला पाण्याचे आवर्तन देत असताना अनेकांनी ठिंबक, तुषार सिंचन पध्दत तसेच कमी पाण्यामध्ये योग्य नियोजन केल्यामुळे शेतकर्यांना एकरी उत्पादन वाढविण्यास मदत झाली असली, तरी पावसाअभावी हवामान बदलामुळे शेतकर्यांना एकरी सरासरी अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची माहिती शेतकर्यांनी दिली.
आगामी साखर गाळप हंगामावर होणार परिणाम
सध्या परिसरातील गुर्हाळघरावर मोठ्या प्रमाणावर गूळनिर्मितीसाठी ऊसतोडणी करण्यात येत असल्यामुळे आगामी साखर कारखान्याच्या गाळप हंगामावर यांचा चांगलाच परिणाम होणार आहे. कारखान्यापेक्षा उसाला चांगला दर मिळतो. पैसेही लवकर मिळतात व वेगाने कमी कालावधीमध्ये उसाचे होत असलेले गाळप, यामुळे शेतकरी सध्यातरी साखर कारखान्यासाठी ऊस ठेवायचे नाव घेताना दिसत नाहीत. कोरेगाव भिवर येथील शेतकरी अशोक वर्पे यांच्या उसास 3 हजार 200 रुपये बाजारभाव मिळाल्याचे कांतीलाल काळे यांनी सांगितले.