तळेगाव दाभाडे : पाऊस थांबताच ऊसतोडणीला आला वेग

तळेगाव दाभाडे : पाऊस थांबताच ऊसतोडणीला आला वेग
Published on: 
Updated on: 

तळेगाव दाभाडे, पुढारी वृत्तसेवा: मान्सूनचा परतीचा पाऊस थांबल्यामुळे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी वेगाने सुरू झाली आहे. तसेच, दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्यक्ष गाळपही सुरू झाले आहे. यंदा विक्रमी गाळपाची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

गाळपास 6 ते 7 लाख टन ऊस

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा या वेळचा 25वा गाळप हंगाम आहे. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पश्चिम हवेली, खेड आणि शिरूर या तालुक्यांत सुमारे 7 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीची नोंद आहे. त्यामुळे गाळपास सुमारे 6 ते 7 लाख टन ऊस उपलब्ध होऊ शकतो.

सर्व ऊस गाळपाचे नियोजन

मागील हंगामात 5 लाख 88 हजार 362 मेट्रिक टन ऊस गाळपास आला होता. या वेळी कार्यक्षेत्रात ऊस लागवड जास्त असल्याने गाळप जास्त दिवस चालवावे लागणार आहे. प्रशासनास अखेरच्या टप्प्यात तारेवरील कसरत करावी लागणार आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आणि सर्व संचालक मंडळ यांनी संपूर्ण गाळपाचे नियोजन केले आहे. संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने गेली 24 वर्षे हा कारखाना सलगपणे सुरू असल्याचे नवले यांनी सांगितले.

पावसामुळे पिकांचे नुकसान

मागील आठवड्यात मावळ तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यातच उसात पाणी जमा झाल्याने उस तोडणीही थांबली होती. त्यामुळे कारखान्यासमोर मोठे संकट उभे राहिले हेाते. सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सर्वत्र उस तोडणीची लगबग दिसत आहे. लवकरात लकवर उस तोडून तो कारखान्यापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन केले जात आहे.

गेल्या वर्षी 153 कोटी अदा

यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विक्रमी गाळप करण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला आहे. या कारखान्यामुळे पाच तालुक्यांतील शेतकर्‍यामध्ये सुबत्ता आलेली आहे. गेल्या वर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे 153 कोटी रुपये अदा केली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news