मुळा, पवना नदीचा श्वास गुदमरला

मुळा, पवना नदीचा श्वास गुदमरला
Published on
Updated on

मैलामिश्रित पाणी नदीत सोडल्यामुळे प्रदूषणात वाढ

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : सांगवी परिसरातून वाहणार्‍या मुळा आणि पवना नदीपात्रातील वाढते अतिक्रमण, जलपर्णी आणि नदीपात्रात सोडले जाणार्‍या ड्रेनेजच्या पाण्यामुळे दिवसेंदिवस नदीप्रदूषणात वाढ होत चालली आहे.तसेच, यामुळे पाण्यातील जलचरांचे अस्तित्व ही नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सांगवीतून वाहणार्‍या मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज पाणी मिसळत असल्याने उन्हाळ्यात जलपर्णी जोमाने वाढण्यास मदत होते. प्रशासनाच्यावतीने जलपर्णी काढण्याचे काम हाती घेतले जाते.

उपनगरातील सामाजिक संस्थाही जलपर्णी काढण्याच्या उपक्रमात सहभागी होतात. मुळा नदीत ड्रेनेज पाणी मिसळले गेल्याने नदी लगतच्या मधूबन सोसायटीमधील रहिवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच नदी पात्रात बांधकामाचे अतिक्रमण वाढल्याने नदीचा मूळ प्रवाह बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील सांडपाणी नदीत मिसळल्याने जलचरांवर याचा होणारा विपरीत परिणाम टाळण्याठी पालिकेच्यावतीने नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला होता.

या प्रकल्प निविदेची रक्कम 96 कोटी 82 लाख होती. प्रकल्प माध्यमातून नदीच्या दोन्ही काठांवर इटर सेप्टर लाईन टाकल्याने अशुद्ध पाणी अडविण्यात येणार होते. पालिकेच्या या प्रकल्याचे पुढे झाले काय? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

देशात 'नमामी गंगे' सारखे उपक्रम राबविले जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात मात्र नदी संवर्धन न झाल्याने मुळा आणि पवना नदीचा श्वास गुदमरलेला दिसत आहे.

नदी सुधारणा प्रकल्प यासाठी मोठा निधी दरवर्षी दिला जातो. परंतु. नद्यांची स्थिती जशी आहे तशीच आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
– कृष्णा भंडलकर, स्थानिक नागरिक

नदीच्या प्रदूषण प्रशासन जबाबदार ठरत असून राजकीय अनास्थाही दिसत आहे. नदी प्रश्नाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांनी कुरघोड्या थांबून प्रशासनाशी एकत्र येऊन नदी सुधार प्रकल्प पूर्ण करणे गरजच आहे.
– अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते

सांडपाणी मुळा नदीत जाऊ नये याकरिता जल:निसरण विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. याबाबत ड्रेनेज विभागाच्या अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहे. मुळा नदीत मिसळले जाणारे पुणे महापालिकेचे सांडपाणी थांबविण्यासाठी पुणे महापालिकेच्या संबधित अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. पवना नदीत ड्रेनेज लाईन दुरस्ती केल्यामुळे नदी प्रदूषणास आळा बसला आहे.
– हर्षल ढोरे, नगरसेवक, सांगवी

पावसाळ्यात मुळा नदीलगत ड्रेनेज लाईन वाहून गेल्या आहेत. मुळा नदीला पर्यावरण ना हरकत दाखला मान्यता मिळून 18 महिने झाले आहेत. सांगवी अंतर्गत मुळा नदीचा तेरा किलोपर्यंत भाग येतो. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प पुणे महापालिकेमार्फत निविदा घेतल्या जाणार आहेत. इंद्रायणी आणि पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प माध्यमातून नदी काठावर इटर सेप्टर लाईनचे काम प्रक्रियेत आहे.
– संजय कुलकर्णी,अभियंता, पर्यावरण विभाग महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news