पन्नास लाख युनिटची वीजचोरी उघड; वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश

पन्नास लाख युनिटची वीजचोरी उघड; वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीजगळती असलेले 230 फीडर निश्चित करून केलेली कारवाई यशस्वी झाली आहे. केवळ तीन महिन्यांत 50 लाख युनिटची वीजचोरी उघडकीस आली असून, या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात. फीडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते.

मुख्यतः वीजचोरीमुळे तूट वाढते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजवापरावर महावितरणच्या अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येत आहे का, मीटरमध्ये फेरफार केला आहे का, कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का, याची माहिती महावितरणच्या कर्मचार्‍यांनी काढली व कारवाई केली. परिणामी, त्या-त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून, 5 दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली आहे.

महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून, अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीजवापराएवढी ही वीज आहे. महावितरणने वीजगळती रोखण्यासाठी आक्रमकपणे काम सुरू केले आहे. त्याचा भाग म्हणून फीडर्सपैकी वीजगळतीच्या बाबतीत टॉपर्स निश्चित करून कारवाई करण्याची रणनीती आखली. त्या-त्या झोनमध्ये कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अधिकार्‍यांना निश्चित केलेल्या फीडर्सची जबाबदारी देण्यात आली.

काही ठिकाणी पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत गळती होती. ती वीस टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. तर, तीस टक्के ते पन्नास टक्के गळती असलेल्या फीडर्सची गळती पंधरा टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. पहिल्या तीन महिन्यांत मिळालेल्या यशामुळे अधिकारी उत्साहित झाले असून, ही मोहीम उद्दिष्ट गाठेपर्यंत पुढे चालू ठेवण्यात येईल. महावितरणतर्फे सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीबरोबरच वीजचोरी रोखण्यावर भर देण्यात आहे. त्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न चालू आहेत. अधिक वीजगळती असलेले फीडर्स शोधून त्याबाबतीत कारवाई करण्याचा उपाय त्याचा भाग आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news