

पुणे : पुढारी वृत्तसेवा
तरुण पिढी वाचनापासून दुरावत चालली आहे. ही बाब लक्षात घेता राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने महाविद्यालयांमध्ये 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे राज्यातील ४५ लाख विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर पुस्तकवाचनाच्या प्रवाहात आणण्याचा मानस राज्य सरकारने आखला आहे.
नव्या वर्षात राज्यातील ४५ लाख विद्यार्थी पुस्तके वाचून त्यांचे परीक्षण लिहिणार आहेत. १ ते १५ जानेवारी या कालावधीत हा वाचन पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे, राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पुस्तकपरीक्षण आणि कथन स्पर्धा राबवावी लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याने वाचलेल्या आवडीच्या पुस्तकातील परीक्षण लिहून द्यावे लागणार आहेत. हे परीक्षण ५०० शब्दांचे असावे किंवा त्याचे ५ मिनिटे कथन करावे. यातील तीन उत्कृष्ट परीक्षणांची निवड करून त्या विद्याथ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस दिले जाणार आहे, असेही उन्य शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
तरुणांना वाचनाकडे वळविण्यासाठी राज्य सरकारने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यारष्टीने महाविद्यालये, विद्यापीठे, सार्वजनिक ग्रंथालये या माध्यमांतून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्यातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे आणि सार्वजनिक ग्रंथालये यांना त्यांच्या संस्थेच्या प्रांगणात वाचनाचा सामूहिक उपक्रम राबविण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या उपक्रमाची छायाचित्रे महाविद्यालयांना त्यांच्या संकेस्थळावर, स्थानिक वर्तमानपत्रात आणि समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस देण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तके वाचावीत आणि ती कशी वाचावीत, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा प्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
असे आहे वेळापत्रक
१ जानेवारी : वाचनकौशल्य कार्यशाळा आयोजित करणे
३ ते ७ जानेवारी: लेखक आणि विद्यार्थी यांच्यामधील वाचनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करणे
१६ जानेवारी: पुस्तकपरीक्षण व कथन स्पर्धेचे आयोजन करणे
२६ जानेवारी: विजेत्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र, बक्षीस देण्यात यावे