

पूर्णा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पुतळ्याच्या शेजारीच एका भजे विक्रेत्याने अनेकांना विविध दैनिक व मासिक वाचनाचे वेड लावले. स्वतः च्या खर्चातून हा भजे विक्रेता दररोज वृत्तपत्रे, मासिक खरेदी करुन आपल्या टपरीवर ठेवत असतो. सोपान पुंजाजी वेडे असे या भजे विक्रेत्याचे नाव आहे. त्यांच्या या उपक्रमाचे शहरातील वाचन संस्कृती जोपासणाऱ्यांनी, वाचनाची आवड असणाऱ्या अनेक तरुणांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे.
या वाचन कट्टा उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश कांबळे, उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे, हाजी कुरेशी, महम्मद शफी, मिलिंद सोनकांबळे, संजय शिंदे, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, उमेश बा-हाटे, प्रविण कनकुटे, अमृत क-हाळे, निवृत्त कर्मचारी, अनेक जेष्ठ पत्रकार उपस्थित होते.
मी अनेक दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर चौकात योगेश वडापाव सेंटरचा गरिबीवर मात करण्यासाठी छोटेखानी गाडा चालवतो. ग्राहकांना नाममात्र दहा रुपयात गरमागरम मिरची भज्जे, कांदा भज्जे, मूग भज्जे, मेदू वडा आदी पदार्थ स्वादिष्ट तयार करुन देतो. असे असताना माझ्या शेजारीच दैनिक पेपरचा स्टॉल आहे. तेथे अनेकजण येतात. काहीजण पेपर खरेदी करुन घेऊन जातात तर काही स्टॉलवर विक्रीस ठेवलेले दैनिकची वरवरची हेडिंगवर नजर मारुन निघून जातात. ज्यांना वाचनाची आवड आहे, पण खरेदीसाठी पैसे नसल्याचे ओळखून मी स्वतःत निर्णय घेत वाचन कट्टा चालू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरुन गरीब असो की श्रीमंत डॉ. आंबेडकर चौकात थांबणा-या सर्वांना विविध दैनिक वाचनाची संधी मिळावी व त्यांना वाचनाचा लळा लागावा, यासाठी हा वाचन कट्टा स्वः खर्चातून अविरत चालू केला आहे. असे भजे विक्रेते सोपान पुंजाजी वेडे यांनी सांगितले.