

Summary:
मैत्रिणीला त्रास दिल्याच्या कारणातून घडला प्रकार
वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर गाडीतून दिले ढकलून
पुणे : वारजे माळवाडीतील पॉप्युलरनगरमधील मॉडर्न ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला दोघांनी जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले. गाडीत त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर त्याला गाडीतून ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका मैत्रिणीला त्रास दिल्यामुळे घडला. (Pune Latest News)
याबाबत 17 वर्षीय विद्यार्थ्याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
तक्रारदार तरुण हा वारजेत राहतो. वारजे भागातील पॉप्युलरनगर येथील मॉडर्न ज्युनिअर कॉलेज या महाविद्यालयात तो शिकत आहे. आरोपी त्याच्या ओळखीचे आहेत. 4 ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास दोघे आरोपी काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून महाविद्यालयाच्या गेटवर आले. दोघांपैकी एक अल्पवयीन युवक आहे. 'आमच्या मैत्रिणीला त्रास का देतो, असा बहाणा करून त्यांनी महाविद्यालयाच्या गेटवरच तक्रारदार युवकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.' दोघांनी युवकाला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसविले. त्याला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच, त्याचे अपहरण करून त्याला नंतर धमकावून सोडून दिले. याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
आरोपींनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नेले. तक्रारदार युवकाला त्यांनी चारचाकीच्या दरवाजातून बाहेर ढकलून दिले. तसेच, त्याला शिवीगाळ करत युवकाला, ‘आता सोडत आहे, जर तू परत आमच्या मैत्रिणीला त्रास दिला तर तुला गायब करीन, परत या जगात तू दिसणार नाहीस’, अशी धमकी दिली.