विहीर बांधकामाला संरचनात्मक आराखडे गरजेचे

विहीर बांधकामाला संरचनात्मक आराखडे गरजेचे
Published on
Updated on

जळोची : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण महाराष्ट्रात म्हसोबाचीवाडी विहीर दुर्घटना हादरवणारी असली, तरी तिच्या तांत्रिक बाजूचा अभ्यास करण्यात आला नाही. यासोबतच चुकीच्या पद्धतीने काम सुरू केल्याने व शासन यंत्रणेनेदेखील प्रत्यक्ष विहिरीवर भेट देऊन पाहणी केलेली नाही. प्लॅन, नकाशा व इतर तांत्रिक बाजू तपासणी न करता या विहिरीसाठी परवानगी दिल्याने दुर्घटना घडल्याचे मत इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स बारामतीच्या लोकल सेंटरने व्यक्त केले आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी संरचनात्मक आराखडे गरजेचे असल्याचे मत या संघटनेने व्यक्त केले.

इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे नुकतीच दुर्घटना घडली. या अपघातानंतर बारामती व इंदापूरसह दहा तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणार्‍या इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स बारामती लोकल सेंटरच्या कार्यकारिणीची बैठक बारामतीमध्ये पार पडली. या पुढे सरकारी, सहकारी खासगी क्षेत्रात आशा दुर्घटना होऊ नयेत, याबाबत चर्चा करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्यामराव राऊत व उपाध्यक्ष सुरज चांदगुडे यांनी सर्व सहकार्‍यांनी प्रत्यक्ष अपघातस्थळ पाहणी केली व कामांमधील संरचनात्मकदृष्ट्या असणार्‍या त्रुटींबाबत मते नोंदविली.

त्यामध्ये विहिरीच्या आरसीसी रिंग कामासाठी संरचनात्मक आराखडे केलेले नसावेत, काम करणारे ठेकेदार पारंपरिक अनुभवातून काम करीत होते. त्यांच्याकडे तांत्रिक बाबींचा विचार करण्याची क्षमता नव्हती. तज्ज्ञ संरचना अभियंत्याचा सल्ला घेतला गेला नाही. विहिरीच्या आकारानुसार वापरण्यात आलेली रिंग व स्टील हे दोन्ही अपुरे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पूर्ण परिघावर, एकाच उंचीवर एकसारखा दाब व अथवा ताण निर्माण झाला असावा. काँक्रीट जाडी, स्टील साईज व त्यामधील अंतर यांचे संरचनात्मक डिझाइन केले गेले नाही आदी निरीक्षणे नोंदविली गेली.

भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स सहकार्य करण्यास तयार असल्याचा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तसेच बारामती लोकल सेंटर गरजू शेतकर्‍यांसाठी मोफत मार्गदर्शन व माफक दरात सुरक्षित स्ट्रक्चरल डिझाइन्स उपलब्ध करून देईल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीस संस्थेचे सचिव मयूर ताडे, खजिनदार समीर कोकरे, सहसचिव प्राचार्य विकास निर्मळ तसेच कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन शिंदे, गणेश नरुटे, प्रा. श्रीकांत बोबडे, प्रा. शहाजी परकाळे, दिलीप यादव व संजय कदम आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news