

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी 'कोटपा' कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा परिमंडळचे सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, नोडल अधिकारी डॉ. राहुल पिंपळकर, जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत, समिती सदस्य उपस्थित होते.
वाडीकर म्हणाले, 'तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत. जिल्ह्यात राबविण्यात येणार्या तबांखूमुक्त शाळा उपक्रमाला गती द्यावी.' तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 2023-24 या आर्थिक वर्षात नोव्हेंबरअखेर 49 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 8 हजार 219 नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 28 तंबाखू नियंत्रण कक्षांमार्फत 4 हजार 499 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्यांंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने 463 नागरिकांवर कारवाई करून 5 हजार 50 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिस विभागाकडून 404 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने 7 नागरिकांवर कारवाई करून 700 रुपये दंडांची रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
ग्रामीण आणि शहर पोलिसांनी 2023-24 मध्ये डिसेंबरअखेर अन्न व औषध अधिनियमाखाली 5 कोटी 45 लाख 63 हजार 153 रकमेचा गुटखा आणि कोटपा कायद्याअंतर्गत 82 हजार 658 रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने 24 प्रकरणात कारवाई करून 1 कोटी 44 लाख 9 हजार 463 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
हेही वाचा