

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हिंदू समाज यापुढे 'लव्ह जिहाद'च्या नावाने कुठलाही अन्याय सहन करणार नाही. कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत केली, तर आम्ही त्यांचे डोळे ठेवणार नाही. पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणणार असून 'लव्ह जिहाद' प्रकरणात जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राणे यांनी केले.
स्वारद फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ, प्रशांत मोडक, हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, स्वाती मारणे, उज्ज्वला पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राणे म्हणाले की, महाराष्ट्रातील काही नेते 'लव्ह जिहाद'ची घटना राज्यात घडत नाही असे सांगतात. हे सगळे खोटे आहे. पोलिस दलातील काही अधिकारी यावर बोलत नाहीत. काही विशिष्ट अधिकारी समोरच्या लोकांना ताकीद देत आहेत, असा आरोप त्यांनी केला. लव्ह जिहाद प्रकरणात संबंधितांवर याचिका दाखल होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.
जो कोणी धर्म बदलण्याची जबरदस्ती करेल, त्याची गय केली जाणार नाही, हा कडक संदेश देण्यासाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही. प्रत्येक जण हिंदू म्हणून एकत्र आलेला आहे.'लव्ह जिहाद'विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली. 'लव्ह जिहाद'बद्दल लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. जिहादींनाही कळू द्या, की गृहमंत्री बदलला आहे आणि मविआचे सरकार राहिलेले नाही, असा टोला राणे यांनी लगावला.
'महाराष्ट्रातील काही ताई बोलतात की, राज्यात 'लव्ह जिहाद'च्या घटना घडतच नाहीत. पण ताई तू मंचरच्या आमच्या पीडित बहिणीला भेटायला गेली पाहिजे होती. तुला त्या शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे,' अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता नितेश राणे यांनी केली.
राणे यांच्या पत्रकार परिषदेला 'लव्ह जिहाद' प्रकरणात अडकलेल्या एका पीडित मुलीलाही आणण्यात आले होते. तिने आपल्यावर गुदरलेला प्रसंग पत्रकारांना सांगितला. या वेळी पत्रकारांनी 'ही मुलगी पीडित असताना तुम्ही तिला पत्रकार परिषदेत कसे आणले', असा प्रश्न विचारला असता राणे यांनी त्याला बगल दिली.