

धायरी : सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील गणेशनगरमध्ये एका सायकलवर जात असलेल्या बारा वर्षांच्या मुलाला कुत्र्याने जखमी केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली होती. या कुत्र्याला व त्याच्याबरोबर असलेल्या आणखी दोन कुत्र्यांना महापालिका श्वान पथकाने उचलून होळकरवाडी येथील कुत्र्यांच्या विभागामध्ये ठेवले असल्याची माहिती श्वानपथकाच्या कर्मचार्यांनी दिली.
दरम्यान, येथील वडगाव धायरी, हिंगणे खुर्द, महादेवनगर, समर्थनगर, तुकाईनगर, वडगाव खुर्द, नर्हे इत्यादी परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. ही मोकाट कुत्री टोळक्याने रस्त्यावर रात्रीच्या वेळी व दिवसाही फिरताना दिसून येत आहेत.ही कुत्री रस्त्याने जाणारे नागरिक, महिला विद्यार्थी, कामगार, चारचाकी व दुचाकी वाहने यांचा पाठलाग करतात. यामुळे बर्याच वेळा दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या कुत्र्यांनी अनेक विद्यार्थी, बालक व महिला यांना चावा घेतला आहे.
मोकाट कुत्री, श्वानपथकाकडून शस्त्रक्रिया करून आणि हद्द बदलून पुन्हा मोकाट सोडली जातात. मात्र, त्यांचा कायमचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
-भूपेंद्र मोरे, रहिवासी, नर्हेरस्त्यावर फिरणार्या मोकाट कुत्र्यांना नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. नियमानुसार कुत्र्यांना अँटी लस/कॉलर लावण्यात आल्यावर पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडण्यात येते.
-डॉ. सारिका भोसले-फुंडे, प्रभारी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका