

दीपेश सुराणा : पिंपरी : शहरातील विविध रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य वाढले आहे. ही भटकी कुत्री दररोज सरासरी 47 जणांचा चावा घेत आहेत. त्यामुळे शहरवासीयांनो सावधान..! येथे भटकी कुत्री फिरतात, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
वाहनचालक व पादचार्यांचा पाठलाग
शहरातील विविध खासगी हॉटेलच्या बाहेर आणि जिथे अन्न मिळेल अशा जागी प्रामुख्याने भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य पाहण्यास मिळत आहे. त्यातही विविध रस्त्यांवर त्यांचे प्रस्थ वाढले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या मागे धावणे, भुंकणे तसेच पादचार्यांचा पाठलाग करणे आदींमुळे नागरिक जेरीस आले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हा अनुभव मोठ्या प्रमाणात येत आहे. मोहननगर-दत्तनगर, थेरगाव, वाकड-काळाखडक, पिंपरी आदी भागांमध्ये सध्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
पशुवैद्यकीय विभागाकडून उपाययोजना
श्वानांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाकडून त्यांना ताब्यात घेतले जाते. श्वानांना काही कालावधीसाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. श्वानांवर रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाते.
श्वानांनी चावा घेतल्यानंतर नागरिकांना आवश्यक औषधोपचार मिळावे, यासाठी महापालिका रुग्णालयांमध्ये व्यवस्था केलेली आहे. त्यावरील ई-सीरम व अन्य औषधे उपलब्ध आहेत. श्वानांनी चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची नोंद नाही.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिकानिर्जन परिसरात आणि झोपडपट्टी भागात श्वानांनी चावा घेण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. श्वानांना पकडून त्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाते.
– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका
महिनाभरात 1409 जणांना चावा
देशपातळीवर गेल्या सात वर्षांमध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना आणि अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींबाबत माहिती सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने भारतीय पशुकल्याण मंडळाला दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर, शहरातील भटक्या श्वानांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात 1 हजार 409 जणांना चावा घेण्याचा प्रकार घडलेला आहे.
श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया
शहरामध्ये श्वानांच्या उपद्रवाबाबत नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिका पशुवैद्यकीय विभागाच्या 4 पथकांमार्फत अशा श्वानांना पकडले जाते. तसेच, त्यांच्यावर केनायन केअर अॅण्ड कंट्रोल या संस्थेमार्फत मोफत निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. तसेच, रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले जाते. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांमध्ये 349 श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, गेल्या आर्थिक वर्षात 12 हजार 697 श्वानांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.