

प्रसाद जगताप
पुणे : शिवाजीनगर (वाकडेवाडी) एसटी स्थानकावर कुत्र्यांच्या वावर वाढला असून, कुत्री प्रवाशांच्या बाकड्यांजवळच ठाण मांडून बसत असल्याचे चित्र आहे. ही कुत्री चावा घेण्याचा प्रवाशांना धोका आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. शिवाजीनगर (वाकडेवाडी) एसटी स्थानक हे एसटीच्या पुणे विभागातील तिसरे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात विविध ठिकाणी सार्वजनिक प्रवासी वाहतूक केली जाते. या स्थानकाची दै. 'पुढारी'कडून पाहणी करण्यात आली. त्या वेळी स्थानकावर विविध समस्या आढळल्या.
शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकाजवळून हे स्थानक वाकडेवाडी येथे मागील काही वर्षांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, प्रवाशांसाठी इथे अद्यापही मूलभूत सुविधा पुरविता आलेल्या नाहीत. अस्वच्छ पाणपोई, खुले स्वच्छतागृह, अनेक ठिकाणी चिखल, चेंबरचे पाणी प्लॅटफॉर्म परिसरात साचल्याचे चित्र आहे. (समाप्त)
शिवाजीनगर (वाकडेवाडी) स्थानकातून आत प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला खड्डे आहेत. त्यामुळे इथे चिखल होतो. तेथेच डाव्या बाजूला पाणी वाहत रस्त्यावर आलेले दिसते. स्थानकाच्या एन्ट्रीला असलेल्या प्लॅटफॉर्मलगत चेंबरचे घाण पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे येथे डासांची पैदास होण्याचा धोका वाढला आहे.
वाकडेवाडी स्थानकात आलेले प्रवासी आणि अधिकारी, कर्मचारी आपल्या दुचाकी थेट प्लॅटफॉर्मवरच लावतात. त्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच, येथे इतर प्रवाशांना ये-जा करताना जखमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने येथे प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांकरिता सुसज्ज अशी पार्किंग व्यवस्था करून देण्याची गरज आहे.
एसटीच्या वाकडेवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या आवारात होणार्या अनधिकृत पार्किंगमुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच भर बेशिस्त रिक्षाचालक घालत आहेत. प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी प्रवेशद्वाराच्या तोंडावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे एसटीला बाहेर पडताना अडथळे निर्माण होत आहेत.