

शिरुर, पुढारी वृत्तसेवा: शिरुर शहरातील रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे व भटकी कुत्री यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहराचा विस्तार वाढत चालला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर जनावरे मोकाट फिरत असतात. अनेकदा रस्त्याच्या मध्यभागी ही जनावरे बसलेली किंवा उभी असतात. याचा पादचारी, वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना त्रास होतो. रस्त्यावर उभी, बसलेली जनावरे अचानक अंगावर धावून येतात अथवा त्यांना धक्का लागल्यास काय होईल, अशी भीती मनात बाळगून जावे लागत आहे. त्यातच शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या ही मोठी वाढली आहे.
अनेकदा मोकाट जनावरे रस्त्यावर बसल्याने व उभी असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता शहराच्या विविध भागात फिरणारी मोकाट जनावरे ताब्यात घेऊन ही जनावरे ज्यांच्या मालकीची आहेत, त्या मालकांवर कारवाई करून त्यांच्या ताब्यात देणे अथवा या जनावरांची कोंडवाडात रवानगी करणे अपेक्षित असताना असे केले जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर शहरत मोकाट फिरणार्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे यासारख्या उपाययोजना देखील केल्या जात नसल्याने शहरात फिरणारी मोकाट जनावरे व कुत्र्यांच्या प्रश्नांवर तातडीने प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.