पुणे; पुढारी वृत्तसेवा: नवीन कात्रज बोगद्यातून पुण्याच्या दिशेला येणार्या कंटेनरने दिलेल्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातात सात ते आठ गाड्यांचा अपघात झाला. या वेळी ट्रॅव्हल्सने कंटेनरला धडक दिली. बसच्या मागे असलेलीही वाहने एकमेकांना धडकली. दरी पुलाजवळ सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला. अपघातामध्ये सात ते आठ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात ट्रॅव्हल बसचा चालक गंभीररीत्या जखमी झाला असून, बसच्या केबिनमध्ये बसलेले अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. बस सातार्याकडून मुंबईच्या दिशेने निघाली होती. नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर दरीपुलावर हा अपघात झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला असून, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंगचे कर्मचारी पोहोचले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या वेळी झालेल्या विचित्र अपघातात वाहने एकमेकांना धडकल्याने रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अपघाताच्या घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर सहा वाहनांचा विचित्र अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही ट्रॅव्हल्स बस मुंबई येथून महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेली होती. सहल आटोपून ती पुन्हा मुंबईच्या दिशेने चालली असताना रस्त्यात दरीपुलाजवळ थांबलेल्या मागून ट्रॅव्हल्सने धडक दिली. या बसपाठोपाठ बर्याच वाहनांची या वेळी धडक झाली.