

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या काळात झालेल्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावाच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात साचला होता. महापालिकेकडून पावसाळापूर्व कामांतर्गत सध्या हा गाळ काढण्याचे काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे तलावाची पाणी साठवणक्षमता वाढणार आहे.
कात्रज तलावातील गाळ काढण्याचे काम 2008 साली करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या पंधरा वर्षांत ओढ्याच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तलावाच्या मुखाजवळ साठला होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पाहणी करून तलावातील गाळ काढण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार हे काम सध्या सुरू आहे.
गेल्या पाच वर्षांत प्रशासनाचे परिसरातील विकास प्रकल्पांच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अनेक प्रकल्प बंद पडले. पावसाळापूर्व कामांतर्गत गाळ काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या कामाबाबत जी तत्परता महापालिकेने दाखवली, ती म्युझिकल फाउंटन, उद्यान स्वच्छता, फुलराणी, सुशोभीकरणासह देखभाल-दुरुस्तीच्या कामांबाबतही दाखवावी, अशी मागणी प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांनी केली आहे.
नानासाहेब पेशवे तलावाच्या मुखाजवळ सुमारे 100 बाय 200 चौरस फूट क्षेत्रावरील गाळ काढण्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या आठवड्यात ते पूर्ण होणार असून, तलावाच्या पाण्याची साठवणक्षमता वाढणार आहे.
– राजेंद्र जाधव, कार्यकारी अभियंता, महापालिका