

रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) येथील एमआयडीसीमधील कंपन्यांतून सोडले जाणारे प्रदूषित पाणी मळद (ता. दौंड) येथील ओढ्याद्वारे तलावात व ग्रामपंचायत कार्यालयासमोर आले आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत बिघडले असून ते मानवी जीवितास व पशुधनास हानिकारक होत आहेत. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे सरपंच मोहिनी भागवत यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधितांना दिले आहे.
सरंपच भागवत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, या प्रदूषित पाण्यामुळे गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या परिसरात सध्या कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. रसायनमिश्रित पाणी पिल्याने नागरिक व जनावरांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झालेला आहे. हे दूषित रसायनमिश्रित पाणी सोडण्यास कारणीभूत असणार्या एमआयडीसीमधील संबंधित सर्वच कंपन्यांवर 15 दिवसांच्या आत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता कुरकुंभ व दौंड तहसीलदार यांना दिले आहे.
सर्वच कंपन्यांना सी.ई.टी.पी. प्रकल्प बंधनकारक असताना कोणत्याही प्रकारची काळजी न घेता रसायनमिश्रित पाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडण्यात येत आहे. हे मानवी जीवनाला, तसेच पशू, पक्षी, प्राणी यांच्या जिवाला धोकादायक तर आहेच, परंतु यामुळे पर्यावरणाचादेखील मोठ्या प्रमाणावर र्हास होत आहे. वर्षानुवर्ष हा प्रकार सुरू असल्याने यावर कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
अॅड. मोहिनी भागवत, सरपंच, मळद