

खोर : पुढारी वृत्तसेवा : मुंबई-सोलापूर तसेच पंढरपूर आणि विजापूरदरम्यान धावणार्या रेल्वे गाड्यांना भिगवण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबरोबरच पुरंदर, भोर आणि वेल्हा तालुक्यांतील काही गावांमध्ये मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी बीएसएनएलचे टॉवर उभारण्याचीही मागणी केली. केंद्रीय दळणवळण तथा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी याविषयी सविस्तर चर्चा केली.
तसेच लेखी पत्रही दिले. पुणे ते सोलापूरदरम्यान धावणार्या एकूण सहा रेल्वे गाड्यांचा भिगवण स्थानकावरील थांबा कोरोना कालावधीत बंद करण्यात आला. तो अद्याप पूर्ववत सुरू करण्यात आलेला नाही. मुंबई-पंढरपूर आणि मुंबई-विजापूर या गाड्यांना भिगवण स्थानकावर थांबा देण्यात यावा, असे पत्रात नमूद केले आहे.
दौंड शहरातील कुरकुंभ मोरीचे काम नुकतेच पूर्णत्वास गेले. त्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. तसेच या मोरीचे औपचारिक उद्घाटन करण्यासाठी अवश्य यावे, असे निमंत्रणही त्यांनी या वेळी दिले.