

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील नगर रोड, सोलापूर रोड आणि सातारा रोड यावर असलेले बीआरटी मार्ग बंद करावेत, असे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविले आहे. बीआरटी मार्ग बंद केल्यामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीला खुला होऊन वाहतूक कोंडी कमी होईल, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी बीआरटी योजना बंद करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुरू आहे. असे असतानाच आता थेट पोलिस आयुक्तांनीच थेट शहरातील महामार्गावरील बीआरटी योजना गुंडाळण्याची सूचना केली आहे.
काय म्हटले आयुक्तांच्या पत्रात
प्रामुख्याने नगर रोड हा राज्य महामार्ग, तर सोलापूर व सातारा हे राष्ट्रीय महामार्ग आहेत. बाहेरून जिल्ह्यातून मुंबई, नगर, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारी वाहने शहरातील याच रस्त्यावरून जात असल्याचे त्यावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच या तीन प्रमुख रस्त्यांवर बीआरटी योजनेमुळे बराचसा भाग केवळ पीएमपीएमएल बससाठी वापरला जातो. त्यामुळे उर्वरित रस्त्यावर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याशिवाय बीआरटी मार्गातून जाणार्या खासगी वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या मध्यभागी असणारे बीआरटी मार्ग बंद करून संपूर्ण रस्ता वाहतुकीकरिता खुला केल्यास व अनावश्यक सायकल ट्रॅक काढल्यास वाहतुकीला अधिक जागा मिळून कोंडी कमी होईल, असे पोलिस आयुक्तांनी म्हटले आहे.
खासगी वाहनांना प्रवेश द्यावा : आ. टिंगरे
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बीआरटी योजना बंद करावी, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंबंधीचा निर्णय होईपर्यंत बीआरटी मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.