पुणे : पोट ठेकेदारांची ‘जलजीवन’मध्ये चलती;  कामे घेतोय एक आणि करतोय दुसराच

पुणे : पोट ठेकेदारांची ‘जलजीवन’मध्ये चलती;  कामे घेतोय एक आणि करतोय दुसराच
Published on
Updated on

नरेंद्र साठे

पुणे : गावगाडा हाकणारेच जलजीवन मिशनच्या माध्यमातून गब्बर होण्याच्या मागे धावत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी कोट्यवधी रुपयांची कामे जिल्ह्यात सुरू असल्याने गाव नेत्यांमध्येच काम मिळवण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागली आहे. कंत्राट कोणीही घेतले तरी प्रत्यक्षात काम मात्र आम्हीच करणार..! हे आर्थिक हित डोळ्यापुढे ठेवून पोट ठेकेदारांकडून सध्या जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनला चुना लावण्याचे काम सुरू आहे.

पुणे जिल्हा परिषदेची जलजीवन मिशनची कामे संथगतीने सुरू असल्याबाबत राज्य शासनाकडून वारंवार अधिकार्‍यांना कामाची गती वाढविण्याच्या सूचना केल्या जात आहेत. जागेची समस्या, कामांवर घेतल्या जाणार्‍या हरकती, जादा दराच्या निविदा अंदाजपत्रकीय दरानुसार काम देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न या सगळ्यांमुळे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना जलजीवन मिशनची कामे पुढे रेटताना विलंब होत आहे.

या कामांमध्ये सध्या गावोगावी एकच प्रश्न समोर आला आहे तो म्हणजे पोट ठेकेदारांचा. कामाचे मूळ कंत्राट पात्र ठेकेदाराला दिलेले असले तरी त्याने त्याच्या अंतर्गत पोट ठेकेदारांना हे कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सोपवल्याचे बहुतांश गावातील चित्र आहे. अनेक गावांमध्ये काम करण्यासाठी स्वतःहून गाव नेते पुढे आले असून त्यांनी मूळ ठेकेदारांकडून कामे मिळवली आहेत. काम पूर्ण होण्याशी मतलब म्हणून ठेकेदारांनी देखील बोलणी करून गावातील किंवा गावाशेजारील व्यक्तींनाच कामे दिली आहेत. तर काही ठेकेदार इतरांकडून कामे करून घेण्यावर देखील भर देत आहेत. परिणामी पोट ठेकेदार संकल्पना जलजीवन मिशनच्या कामांमध्ये चांगलीच रुजली आहे.

कामांमध्ये आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यालय किंवा इतर कार्यालयात ठेकेदारांबरोबरच या पोट ठेकेदारांची देखील मोठी गर्दी आहे. येनकेन प्रकारे काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या सर्व खाबूगिरीच्या धोरणात जलजीवन मिशनच्या कामाच्या दर्जावर परिणाम होण्याची देखील शक्यता असल्याचे नागरिक सांगतात. काही गावकर्‍यांनी तर याविरुद्ध आंदोलनाचे हत्यार देखील काढले. पण, या मुरब्बींच्या पुढे सर्वसामान्यांचा निभाव लागत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.

काम करणार्‍याकडे हवा परवाना
शासकीय कामाचे कंत्राट देताना संबंधित ठेकेदाराकडे काम करण्याचा परवाना असणे आवश्यक असतो. निविदा घेतलेल्या ठेकेदाराकडे हा परवाना असल्याशिवाय कामाचे कंत्राट मिळत नाही. परंतु, त्याच्याकडून जेव्हा काम पोट ठेकेदाराला दिले जाते, त्याच्याकडे परवाना आहे किंवा नाही याची कोणीच पडताळणी करत नाही. परिणामी कामात हलगर्जीपणा, निकृष्ट काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोट ठेकेदारांचा मुद्दा आमच्या निदर्शनास आलेला आहे. कामात हलगर्जीपणा केला तर आम्ही ठेकेदारालाच पकडतो. कामात त्रुटी राहिल्यास किंवा निकृष्ट काम झाले तर कारवाई होणार. जलजीवन मिशनच्या कामाला गती देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

                                               प्रकाश खताळ, कार्यकारी अभियंता,
                                                ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news