पुणे : चौथ्या मजल्यावर उतरली अन् अडकली; चोरी करणारी मोलकरीण अटकेत

पुणे : चौथ्या मजल्यावर उतरली अन् अडकली; चोरी करणारी मोलकरीण अटकेत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : घरातील दागिने चोरी केल्याचा संशय तर तिच्यावर होता. चौकशी करून घराची झडती घेतली तरी देखील दागिने मिळून आले नाहीत. मात्र, चौकशीच्या दरम्यान ती अडखळली अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकली. चोरी केल्याच्या दिवशी ती इमारतीत आली होती. कामाच्या ठिकाणी थेट सातव्या मजल्यावर न जाता ती चौथ्या मजल्यावर उतरली. तिला लिफ्टमध्ये कॅमेरे होते याची माहिती होती. तिथेच ती फसली आणि तिचा हा बनाव पोलिसांच्या नजरेतून जास्त काळ सुटू शकला नाही. 35 वर्षीय मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरी केलेले दागिने जप्त केले आहेत.

मुलाचा वाढदिवस दापोली येथे साजरा करण्यासाठी आयटी अभियंता आपल्या कुटुंबीयासह दापोली येथे गेले होते. घरी परत आल्यानंतर पूजेसाठी लागणारे दागिने कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवल्याचे मिळून आले नाहीत. याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली होती. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, हडपसर पोलिसांनी येथील सीसीटीव्ही तपासणी केली. मात्र, आरोपी मिळून येत नव्हते. संबंधित महिला ही फिर्यादीच्या घरी कामाला असल्याने तिची चौकशी करण्यात आली.

मात्र, हाती काही लागले नाही. तिच्या घरात देखील काही आढळले नाही. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. त्यावेळी मोलकरीण चौथ्या मजल्यावर चोरी झाल्याच्या दिवशी दिसून आली. अभियंता हे सातव्या मजल्यावर राहात होते. त्यामुळे पोलिसांना तिचा संशय आला. तसेच घरमालक घरी नसताना ती तेथे कशाला आली, हे देखील पोलिसांना संशयास्पद वाटले.

तपासात महिलेचा पती रिक्षाचालक असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी रिक्षा तपासणी केली असता पाठीमागील सीटखाली दागिने आढळून आले. त्यानंतर महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. उर्वरित दागिने हे महिलेने घराच्या टेरेसवर असलेल्या कचर्‍याच्या ड्रममधून काढून दिले. घरमालक हे बाहेर फिरण्यासाठी जाण्याच्या अगोदरच तिने घराची एक चावी चोरी करून आपल्याकडे ठेवली होती. त्याद्वारे दरवाजा उघडून तिने चोरी केली होती. तिच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरिंवद गोकुळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंंदे, कर्मचारी शाहीद शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news