

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी अभियोग्यता अन् बुद्धिमापन चाचणी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. त्यामुळे डी. एड्, बी. एड्., एम. एड्. च्या शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांनाही संबंधित परीक्षा देता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेसंदर्भातील सुधारित तरतुदी जाहीर केल्या आहेत. या तरतुदीनुसार, शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवारही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. (Latest Pune News)
परंतु, शिक्षक अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाणार नाहीत व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल, अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे.
या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही. दिलेल्या मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणांनुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
काही विद्यापीठातील डी. एड्, बी. एड् आणि एम. एड्. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना केवळ 20 दिवसांमुळे या परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याचा धोका निर्माण झाला होता; परंतु या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.