

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कांदा साठवणुकीसाठी उभारण्यात येत असलेल्या कांदाचाळींच्या धर्तीवर बेदाणा साठवणुकीसाठी बेदाणा शेड उभारण्याकरिता शासनाने अनुदान द्यावे. त्याचबरोबर द्राक्ष निर्यातीच्या ग्रेपनेटच्या धर्तीवर बेदाण्यासाठी रेझीम नेट ही ऑनलाइन प्रणाली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. गुणवत्तापूर्ण बेदाणा उत्पादन घेऊन मार्केटिंगच्या जोरावर जागतिक बाजारात द्राक्ष उत्पादकांनी उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या 63 व्या वार्षिक मेळाव्यानिमित्त आयोजित द्राक्ष परिषदेचे दीपप्रज्वलनाने पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्या वेळी पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर द्राक्ष संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, चंद्रकांत लांडगे, संघाचे माजी अध्यक्ष सोपान कांचन, राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते आणि आंतरराष्ट्रीय द्राक्षतज्ज्ञ उपस्थित होते. राज्यभरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाची बेदाण्याची गरज आपल्या स्वतःच्या उत्पादनातून आपण पन्नास टक्केदेखील पूर्ण करू शकत नाही. त्याच वेळी अफगाणिस्तानातून 25 हजार टन इतका बेदाणा आपल्या देशात आयात होतो; म्हणून जागतिक बाजारात विक्री होणार्या बेदाण्याचे उत्पादन घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून पवार म्हणाले की, राज्यात पाऊस नसल्याने काही धरणांची स्थिती चिंताजनक असून, काही धरणे भरली आहेत. पावसाअभावी खरीप पिकांच्या दुबार पेरणीची मन:स्थिती झाली आहे. नैसर्गिक आपत्तीतून द्राक्षबागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक आच्छादनासाठी 50 टक्के अनुदान राज्य सरकारने द्यावे. द्राक्ष पिकाच्या कर्जाला सरकारने व्याजातून पाच वर्षे सूट द्यायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते म्हणाले की, प्रायोगिक तत्त्वावर शंभर हेक्टर द्राक्षबागेवर प्लास्टिक आच्छादनास राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान मंजूर केले आहे. हेक्टरी 4 लाख 81 हजार रुपये खर्च निर्धारित धरून 2 लाख 41 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. मनरेगा योजनेत द्राक्ष पिकांचा समावेश करण्यात आला असून, 50 हेक्टरवर द्राक्ष लागवड झालेली आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले की, चालू वर्षी सुमारे 2 लाख 67 हजार मेट्रिक टन द्राक्षाच्या निर्यातीमधून आपण 2 हजार 543 कोटींचे परकीय चलन मिळविले असून, महाराष्ट्राचा वाटा 98 टक्के आहे. संकटाच्या काळात सरकारने द्राक्ष शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी त्यांनी केली. उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी आभार व्यक्त केले.
हेही वाचा :