राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुण्यात छापे; मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुण्यात छापे; मद्यासह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त 
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बिबवेवाडी आणि कात्रज परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापे टाकले. गोवा बनावटीचे मद्य आणि दुचाकी असा 5 लाख 85 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य आणि बिअरची वाहतूक व विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात गस्त घातली जात आहे.
शिवतेजनगर  अप्पर बिबवेवाडी येथील एका व्यक्तीकडे अवैध पद्धतीने गोवा बनावटीच्या मद्याचा साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असताना 180 मिली क्षमतेच्या 96 सीलबंद बाटल्या व एक दुचाकी मिळून आली.  त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आणखी काही माल स्वतःच्या घरात साठा करून ठेवल्याचे सांगितले.  तेथून पथकाने विविध कंपन्यांच्या 750 मिलीच्या 36 आणि 180 मिली क्षमतेच्या 480 सीलबंद बाटल्या, तेरा बॉक्स आढळून आले. त्याने हा मद्यसाठा कात्रज येथील एका व्यक्तीच्या घरातून आणून केल्याचे सांगितले.
त्यानंतर पथकाने कात्रज येथे छापा टाकला असता विदेशी मद्याच्या 750 मिलीच्या 301 बाटल्या,180 मिलीच्या 348 बाटल्या आढळून आल्या. एकाच दिवशी तीन ठिकाणी छापे टाकून  उत्पादन शुल्क विभागाने दुचाकी, मोबाईल आणि मद्यसाठा असा 5 लाख 85 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य आयुक्त विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, पुणे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक कटकम, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, संजय राणे, नवनाथ मारकड, प्रियंका राठोड, राहुल खाडगीकर, कर्मचारी विशाल गाडेकर, माधव माडे, गोपाल कानडे, शरद भोर यांच्या पथकाने केली.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर  होणार्‍या अवैध दारू विक्रीबाबत कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाकडून 17 विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात  ही कारवाई करण्यात येत आहे.
– चरणसिंग रजपूत,  अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभाग पुणे 

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news