

हिंजवडी : मागील अनेक वर्षांपासून आयटीनगरीच्या ग्रामस्थांची डोकेदुखी ठरत असलेल्या कचरा समस्येला काही प्रमाणात मार्ग निघत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण हिंजवडी परिसरातील विविध रस्त्यांवर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येत आहे. यासाठी हिंजवडी ग्रामपंचायत आक्रमक झाली असून, अक्षरशः रात्रभर जागून ग्रामपंचायतीचे कर्मचारी परिसरात खडा पहारा देत आहेत.
कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाई
ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरात उघड्यावर कचरा टाकणार्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. कचरामुक्त गाव असा संकल्प करत ग्रामपंचायतीचे अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार हिंजवडी गावठाण, अंतर्गत रस्ते, अडगळीची ठिकाणे, आयटी पार्क परिसर तसेच वाड्या- वस्त्यांवर ग्रामपंचायत कर्मचार्यांची विविध पथके रात्रभर दबा धरून बसलेली असतात. कचरा टाकताना रंगेहाथ पकडून संबंधितांकडून मोठा वसूल केला जातो.
अनेक ठिकाणे बनली अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड
ग्रामपंचायतीच्या अशा बेधडक कारवाईमुळे परिसरातील बेशिस्त ग्रामस्थ, छोटे-मोठे व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत. कचर्यामुळे मागील अनेक महिन्यांपासून हिंजवडी गावठाणसह परिसरात ठिकठिकाणी अनधिकृत डम्पिंग ग्राऊंड तयार होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण तर होत होते. मात्र, ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्नही निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा अशा ठिकाणी साफसफाई करून, जनजागृतीविषयी फलक लावण्यात येत आहेत. मात्र, अनेकदा आवाहन करूनही हिंजवडी परिसरात जागोजागी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने ग्रामपंचायतीने आता आक्रमक पावित्रा घेतला आहे.
कर्मचार्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून ग्रामपंचायत हद्दीत रात्री अपरात्री अंधाराचा फायदा घेत कचरा टाकणार्यांचा बंदोबस्त केला जात आहे. अशा उपक्रमात सातत्य ठेवल्यास उघड्यावर कचरा टाकणार्यांचे प्रमाण खूप कमी होईल, असा विश्वास स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. यासाठी मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी आयोजित केलेल्या इंदूर भेट दौरा, तेथील कचरा व्यवस्थापन आणि अधिकच्या उपाययोजना यांचा लाभ प्रशासनाला होत असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.
हिंजवडी परिसरात जागोजागी कचर्याचे ढीग दिसत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, काही बेशिस्त नागरिकांमध्ये सुधारणा होत नाही. त्यामुळे अशी कारवाई करणे गरजेचे आहे.
– सचिन जांभूळकर,
सरपंच, हिंजवडी ग्रामपंचायत