‘कायम’साठी कर्मचारी आक्रमक; हंगामी रोजंदारांचे मुख्यालयासमोर आंदोलन

‘कायम’साठी कर्मचारी आक्रमक; हंगामी रोजंदारांचे मुख्यालयासमोर आंदोलन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या 5 वर्षांपासून आम्हाला कायम केलेले नाही, त्यामुळे आम्हाला आतातरी पीएमपी प्रशासनाने कायम करावे, या मागणीसाठी सोमवारी (दि.15) पीएमपीतील बदली हंगामी कर्मचार्‍यांनी पीएमपी मुख्यालयासमोर आंदोलन केले. शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी अध्यक्षांनी देखील या बदली हंगामी रोजंदारीवरील कर्मचार्‍यांना सेवेत कायम करू घेण्याचे आश्वासन दिले. शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी आंदोलनाचे नेतृत्वकेले. या वेळी पीएमपीचे कर्मचारी सहभागी झाले होते.

पीएमपीच्या ताफ्यात 2017-18 साली भरती झालेले 1 हजार 925 बदली हंगामी कामगारांना अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कायम करण्यात आलेले नाही. तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी यांच्या कार्यकाळात सुमारे 1400 बदली हंगामी कर्मचार्‍यांना कायम करण्यात आले होते. त्यानंतरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओम प्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह यांच्या कार्यकाळात तरी आम्हाला कायम केले जाईल, अशी या कर्मचार्‍यांची अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या हाती निराशाच लागली.
आता नव्याने पदभार घेतलेले अध्यक्ष संजय कोलते यांनी यात लक्ष घालून आम्हाला आता तरी 'कायम' करावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

कायम करण्यासाठी धोरण ठरवा

बदली हंगामी रोजंदारी कर्मचार्‍यांना किती वर्षांनी कायम करायला हवे, यासंदर्भात पीएमपी प्रशासनाने अद्यापपर्यंत धोरण ठरवलेले नाही. त्यामुळे कामगारांना कायम होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागत आहे. त्यामुळे आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणीही बदली कर्मचार्‍यांकडून सातत्याने केली जात आहे.

आता 5 वर्ष झाली, किती दिवस आम्ही बदली हंगामी कामगार म्हणून काम करणार, कोरोना काळात तर आम्हाला काम आणि वेतन नव्हते, आमचे खूप हाल झाले. कायम असतो तर किमान थोडीफार आर्थिक मदत झाली असती. प्रशासनाने आम्हाला आता लवकरात लवकर कायम करावे, नवीन अध्यक्षांनी यात लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा.

– पीएमपीतील एक बदली हंगामी रोजंदारी कामगार

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news