विमाने जमिनीवर; सातत्याने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल | पुढारी

विमाने जमिनीवर; सातत्याने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल

पुणे : पुणे विमानतळावरून जाणारी 11 आणि येणारी नऊ अशी एकूण 20 विमान उड्डाणे सोमवारी (दि.15) रद्द झाली. खराब हवामानामुळे निर्माण झालेली शून्य दृश्यमानतेच्या परिणामाने सातत्याने विमाने रद्द होत असून, विमान प्रवाशांचे हाल होत आहेत. परिणामी, प्रवाशांचा नियोजित प्रवास थांबला असून, नियोजित कामे रखडली आहेत. पुण्यातून दिल्लीसह जयपूर, हैदराबाद, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, कर्नाटक, नागपूर भागात होणारी 11 विमानांची उड्डाणे रद्द झाली.

तर चेन्नई, चंदिगढ, गुवाहाटी, दिल्ली, गोवा, नागपूर, कर्नाटक, कोलकातामधून पुण्यात येणार्‍या नऊ, अशा एकूण 20 फेर्‍या रद्द झाल्या आहेत. रविवारी (दि.14) 10 विमान उड्डाणांच्या फेर्‍या रद्द झाल्या. खराब हवामानामुळे सातत्याने विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची चांगलीच कसरत होत आहे. उत्तर भागासह दक्षिण भागातील हवामान दिवसेंदिवस खराब होत आहे. धुक्यामुळे पुण्यातून विविध भागात होणारी विमान उड्डाणे सातत्याने रद्द केली जात आहे. परिणामी, प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खराब हवामानामुळे 20 विमान फेर्‍या रद्द झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित विमान कंपन्यांकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, पुणे विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) सुद्धा प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

हेही वाचा

Back to top button