

राहुल हातोले :
पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येत आहे. त्यानुसार, आता वल्लभनगर एसटी आगारामधून महिन्याकाठी किमान सहा हजार ज्येष्ठ नागरिक भटकंतीचा लाभ घेत आहेत. खासगी वाहतुकीच्या तुलनेत एसटीची सेवा उत्तम आणि सुरक्षित असल्याने कुटूंबातील मंडळीही निश्चिंत असल्याचे मत काही ज्येष्ठांनी व्यक्त केले. 15 ऑगस्ट 2022 रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत केला आहे. त्यानुसार, 25 ऑगस्टपासून राज्यात एस. टी. कडून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी ज्येष्ठांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येत होती; परंतु यामध्ये बदल करून 75 वर्षांवरील नागरिकांना राज्य सरकारने एस. टी. मधून मोफत प्रवासाची सेवा सुरू केली आहे.
पूर्वी कुटूंबातील इतर सदस्य घरातील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना घराबाहेर जाण्यासाठी मनाई करीत होते. खासगी प्रवासी वाहतुकीवर विश्वास नसल्याने नातेवाइकांना चिंता वाटत होती. मात्र एसटीची सेवा उत्तम आणि सुरक्षित असल्याने आता कुटूंबाची चिंता दूर झाली आहे.
संपूर्ण पुणे विभागामधून 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एकूण नऊ लाख ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत एसटीमधून मोफत प्रवास केला आहे.
थंडीतही लांबच्या पल्ल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा एसी सुविधा असलेल्या शिवशाही बसमधून प्रवासास पसंती मिळत आहे. ऐन थंडीत एसी सुविधा असणार्या शिवशाहीतून प्रवास करणार्या ज्येष्ठांचे प्रमाण जास्त आहे. दररोज सरासरी 100 ते 150 जण शिवशाहीने प्रवास करत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजना सुरू झाली असून, ज्येष्ठांचा याला मोठा प्रतिसाद लाभला आहे. बर्याचदा वल्लभनगर आगारामधून ज्यादा गाड्यांची सोय करण्यात येत आहे. लांबच्या पल्ल्यासाठी गावाकडे भेटी-गाठीसाठी जाण्यार्या ज्येष्ठांची संख्या अधिक आहे.
– पल्लवी पाटील, स्थानक प्रमुख, वल्लभनगर आगार.