

राहुल हातोले :
पिंपरी : दापोडी येथील एसटी बांधणी प्रकल्प हा आशिया खंडामधील सर्वात जुना आणि सर्वात मोठा प्रकल्प आहे. या एस.टी. बांधणी प्रकल्पात एकूण 440 कर्मचार्र्यांपैकी 63 महिलांचा देखील सहभाग आहे. या महिला प्रकल्पातील सर्व अवघड कामांची जबाबदारी यशस्वीरित्या पेलत असून, पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.
वर्कशॉपमधून दर वर्षाला हजार बसची निर्मिती
वर्षाला एक हजार बसची पुनर्बांधणी, तेवढ्याच बसची दुरुस्ती या सर्वांमध्ये महिलांचा वाटा तेवढाच मोठा
येथील इंजिन, टायर, पंप आदी सर्व शाखांमध्ये महिलांचा सहभाग
नागरिकांच्या सेवेत येणार्या बस बांधणीत महिलाही अग्रेसर
ड्रील मशीन दुरुस्ती, बसमधील पंखे बसविण्याचे किचकट कामे, तर लोखंडी पत्रे गॅस कटर मशीनजवळ लावण्याचे अवघड कामे महिला यशस्विरित्या करीत आहेत.
वजनदार टायरही नेतात सहजपणे
या मध्यवर्ती कार्यशाळेत एस.टी.ची बांधणी हे मुख्य काम असले तरी त्यासोबतच जुन्या गाड्यांची पुन्हा बांधणी, टायर बसविणे, इंजिन बांधणीसह एस.टी.ची बरीच कामे केली जातात. यामधील सर्वात अवघड कामांमध्ये महिलांचा सहभाग आहे. वेल्डिंग, पेंटिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसह गाड्यांचे वीस ते पंचवीस किलो वजनाचे टायर एका जागेवरून दुसर्या जागेवार ने-आण करायचे कामही महिला उत्साहाने करीत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार आयटीआय उत्तीर्ण झालेल्या महिला या कार्यशाळेत कार्यरत आहेत. महामंडळामध्ये महिला वाहक, वाहतूक नियंत्रक, लेखनिक तसेच अधिकारी पदांवर महिला या यशस्विरित्या काम करत आहेत. या महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत एस.टी. बांधणीमध्ये पुरुषांप्रमाणेच सचोटीने कार्य करीत आहेत.
– द. गो. चिकोर्डे, व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी