पुणे : तळेगावात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते

पुणे : तळेगावात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते

तळेगाव दाभाडे :  स्टेशन भागात सुरवातीच्या पावसानेच दाणादाण उडाली आहे धोकादायक खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्यात आले नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाज करणे त्रासदायक होत आहे. धोकादायक खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे पाण्याने भरले असुन अत्यंत धोकादायक झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे आहेत की खड्डयात रस्ते आहेत ते कळत नाही. तळेगाव स्टेशन भागात एसटीस्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळच्या रोडवर मोठा आडवा खड्डा अनेक दिवसांपासून पडला आहे तेथे एसटीच्या बसगाड्यांची,सीटी बसगाड्यांची वाहतूक असते.

या खड्डयामुळे एसटी चालक,वाहकांना आणि प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. तसेच येथे एसटी स्टँड,रेल्वे स्टेशन,बस थांबा जवळ असल्यामुळे प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रिक्षांचीही ये-जा असते या खड्डयांमुळे रिक्षाचालकांना आणि त्यामधील प्रवाशांनाही धोकादायक होत आहे. तसेच हिंदमाता भुयारी मार्गाजवळ स्वप्न नगरीच्या बाजुस रस्त्यावर अनेक खड्डे पडले असुन त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. शुभम कॉम्प्लेक्स येथे जुन्या भाजी मंडई जवळ,स्वप्न नगरी येथे अनेक दिवसापासुन रस्त्याचे मधोमध अनेक धोकादायक खड्डे आहेत तेथे पायी जा-ये करणा-यांना आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरावा लागत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची आणि डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक होते तसे प्रशासनास अनेक वेळा निदर्शनास आणले परंतु प्रशासाने दखल घेतली नाही. हे धोकादायक खड्डे पाण्याने भरल्यानंतर वाहनचालकांस अंदाज येत नसल्यामुळे अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. धोकादायक खड्डे इंद्रायणी वसाहत,आनंद नगर,वनश्री नगर,आदी ठिकाणीही आहेत. तसेच स्टेशन भागात अनेक ठिकाणी पाईप लाईन जमिनीत पुरणेची कामे चालू असून यासाठी साठी व्यवस्थित असलेले डांबरीकरण फोडून चा-या खोदण्यात येत आहेत. परंतु, त्या चा-या पुर्ववत व्यवस्थित बुजविण्यात येत नसल्यामुळे चिखल होत असुन तेथे पाणीही साचत आहे. यामुळे पादचा-यांना,वाहन चालकांना आणि त्या लगत असलेल्या दुकानदारांना अडथळे येत असुन त्यांचे व्यवसायावरही परिणाम होत आहे याबाबत प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे. अशी नागरिकांची मागणी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news