

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व प्रसिद्ध गणपती मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात थाटात पार पडला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे आदी उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेवून सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रपठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करून लग्नमंडपाचे स्वरूप दिले होते.