परिंचे : ’सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात श्री क्षेत्र वीर गुलालमय

परिंचे : ’सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात श्री क्षेत्र वीर गुलालमय
Published on
Updated on

परिंचे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस मारामारीने (रंगाची शिंपण) साजरा करीत दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली. या वेळी मंदिरात सवाई सर्जाचा जयघोष करून मानाच्या पालख्यांवर फुलांची उधळण करीत रंग टाकण्यात आला. देवाच्या लग्नानंतर भाकणूक, गजगोपाळांच्या पंगती, मानाच्या पालख्या व काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा, अशा दहा दिवसांच्या उत्सवाची सांगता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्तीवर रंगाचे शिंपण करून करण्यात आले. या उत्सवाला 'मारामारी' असे म्हणतात.

पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता धूपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली. त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील 20 गावांच्या वस्त्रधारण केलेल्या मानाच्या काठ्या ढोल-ताशांसह अब्दागिरी, निशाण, छत्री, दागिनदार व सर्व मानकरी, तसेच मंदिरातील मानाच्या पालखीने मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळवाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, पिंटू शिंगाडे यांनी भाकणूक (भविष्यवाणी) सांगितली.

भाकणुकीनंतर दुपारी दीड वाजता रंगाचे शिंपण मानकरी जमदाडे यांच्यामार्फत करण्यात आले. देवस्थानच्या वतीने यात्रेनिमित्त भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, स्वयंसेवक आदी सुविधा पुरविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.

सासवड पोलिसांच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. या यात्रा काळात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सर्व विश्वस्त, सल्लगार मंडळ, ट्रस्टचे सर्व कर्मचारी, वीरचे सरपंच, ग्रामसेवक, देवाचे मानकरी, सालकरी, गुरव, घडशी, तसेच अनेकांनी यात्रा निर्विघ्न पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.

50 ते 60 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ
वीर येथील यात्रेदरम्यान यात्रेच्या सुरुवातीपासून ते अगदी यात्रेच्या समाप्तीपर्यंत महेंद्र गोपीचंद जगताप यांच्या वतीने आलेल्या सर्व श्रीनाथ भक्तांना उत्कृष्ट असे भोजन देण्यात आले. यात्रा काळात 50 ते 60 हजार भाविकांनी याचा लाभ घेतला, असे संदीपनाना जगताप यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news