

हनुमंत देवकर :
महाळुंगे इंगळे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विस्तारीकरणासाठी चाकणच्या पाचव्या आणि तळेगाव दाभाडेच्या चौथ्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रिया करण्याचे काम गतीने सुरू आहे. चाकण आणि तळेगावमध्ये अपेक्षित भूसंपादन जागेपैकी निम्मी जागा संपादित केली असून, संबंधितांना मोबादलाही दिला आहे.
उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीने तळेगाव आणि चाकण येथे अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यासाठी शेतकर्यांना चांगला दरही देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी जमीन देण्यास तयारी दर्शवित असल्याचे चित्र आहे. चाकणच्या पाचव्या टप्प्यासाठी 693.44 हेक्टर जमीन संपादन करायची आहे. त्यामध्ये चाकण, वाकी या ठिकाणच्या जमिनी सोडून 561 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी आतापर्यंत 397 हेक्टर जमिनीचा ताबा मिळाला आहे. 13.91 हेक्टर क्षेत्र हे सरकारी जमीन असल्याने ती हस्तांतर केली आहे. उर्वरीत जमीन आता संपादन करायची आहे. आतापर्यंत एकूण 545 कोटींपैकी 508 कोटी रुपयांचे चाकण येथे वाटप केले आहे. त्यापैकी 37 कोटी रुपयांची रक्कम खेड प्रांताधिकारी यांच्याकडे शिल्लक आहे.
दरम्यान, औद्योगिक विकास महामंडळाकडून पवळेवाडी (ता. मावळ) या गावामधून भूसंपादन करण्यात येणार आहे. तळेगावमध्ये प्रतिएकर 73 लाख, तर चाकणला प्रति एकर 55 लाख रुपये दर दिला आहे. तळेगावात आंबळे येथील 453.55 हेक्टर जमिनीच्या उद्दिष्टापैकी 250 हेक्टरचा ताबा मिळाला आहे. तेथे 203 हेक्टरचे संपादन बाकी आहे. त्यासाठी एमआयडीसीने मावळ प्रांत कार्यालयास 450 कोटी रुपये दिले असून, पैकी 419 कोटी रुपयांचा शेतकर्यांना मोबादला दिला आहे. 30 कोटी 96 लाख 20 हजार 420 रुपयांची रक्कम शिल्लक आहे, असे एमआयडीसीच्या अधिकार्यांनी सांगितले.
चाकणला सक्तीचे भूसंपादन ?
चाकणच्या पाचव्या टप्प्यासाठी बिरदवडी, रोहकल, आंबेठाण, गोनवडी या 4 गावांतील सुमारे 95 हेक्टर जमीन सक्तीने संपादन करण्याचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुख्यालयास पाठविला आहे. त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. स्वेच्छेने जमीन दिल्यास शेतकर्यांना 15 टक्के परतावा मिळतो. मात्र, सक्तीने भूसंपादन केल्यास 15 टक्के परतावा मिळत नाही. त्यापैकी अनेक शेतकर्यांनी संमती दर्शवीत जमीन देण्याची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.
मागील काही महिन्यांपासून तळेगाव आणि चाकण येथील विविध टप्प्यांसाठी जमीन संपादन करण्यात येत आहे. चाकण आणि तळेगावमध्ये अपेक्षित जागेपैकी निम्मी जागा संपादन करण्यात यश आले आहे. त्यामुळे या संपादन प्रक्रियेला गती मिळत आहे.
– सचिन बारवकर, प्रादेशिक अधिकारी