

पुणे: राज्यात पूर्व प्राथमिकच्या अनेक खासगी शाळा आहेत. परंतु, या शाळांमध्ये मुलांना योग्य त्या सोयी-सुविधा मिळतात का, पाल्यांसाठी तिथले वातावरण कसे आहे, याची माहिती मिळावी म्हणून शिक्षण विभागाने 15 दिवसांपूर्वी संबंधित शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणी प्रक्रियेला वेग आला असून राज्यात आतापर्यंत नऊ हजार 402 पूर्व प्राथमिक शाळांनी नोंदणी केल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेताना अनेक पालक ती शाळा अधिकृत आहे का नाही, याची चौकशी करत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पालकांनी देखील त्या शाळेविषयी संपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. (Latest Pune News)
याबरोबरच शाळेचा परिसर स्वच्छ असावा, पाल्यांना आरामदायक खुर्च्या, टेबल असावेत, शैक्षणिक खेळणी असावीत. त्याचबरोबर शाळेची इमारत हवेशीर असावी, पुरेसा सूर्यप्रकाश असणे गरजेचे आहे.
शाळेतील शिक्षकांचे शिक्षण किती झाले आहे, फी किती घेतली जाते, शाळा नोंदणीकृत आहे का, हे पालकांच्या पर्यायाने बालकांच्या द़ृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे शासनाने या खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे देखील शिक्षण विभागातील अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
पूर्व प्राथमिकच्या शाळांचे प्रकार अनेक आहेत ज्याला डे केअर सेंटर, मॉन्टेसरी शाळा, बालवाडी, खेळण्याची शाळा, नर्सरी स्कूल, शिशू विहार अशी अनेक नावे देखील देण्यात आली आहेत. परंतु, ज्या शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. अशा पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापुढे नोंदणीकृत पूर्वप्राथमिक शाळांमध्येच विद्यार्थ्यांचे प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित शाळांनी देखील नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
केजी शाळांची जिल्हानिहाय संख्या
पुणे- 1,595, ठाणे-951, अहिल्यानगर-576, नागपूर 525, मुंबई महापालिका अंतर्गत- 309, मुंबई शिक्षण उपसंचालक अंतर्गत- 22, नाशिक- 371, नांदेड- 211, कोल्हापूर- 358 उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 200 पेक्षा कमी संख्येने शाळांची नोंदणी झाली आहे.