

पुणे: सरव्हटंस ऑफ इंडिया संस्थेतील घोटाळेबाज सचिव मिलींद भगवंत देशमुख याच्या हकालपट्टीनंतर संस्थेतील कारभार आता सायलेंट मोडवर आल्याची चर्चा आहे. देशमुख याची संस्थेतून बडतर्फी होताच आता संचालक मंडळातील प्रामाणिक विश्वस्त एकत्र येऊन संस्थेला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.धर्मदाय आयुक्तांसमोरील सुनावणीत नुकतीच ही बाब प्रकर्षांने जाणवली.
या प्रकरणातील तक्रारदार तथा संस्थेतील विश्वस्त प्रविणकुमार राऊत यांनी मिलींद देशमुखच्या मनमानी कारभाराविरोधात धर्मदाय न्यायालयात विश्वस्त बर्खास्त करण्याची तक्रार केली.यात त्यांनी म्हटले होते की,मिलींद देशमुख, अध्यक्ष दामोदर साहू हे संस्थेत स्वतःच्या मुलांनाच विश्वस्त म्हणून घुसवून आर्थिंक नाड्या स्वतःच्या ताब्यात घेत आहेत. (Latest Pune News)
त्यामुळे देशमुख यांना मुलगा चिन्मय देशमुख,ज्येष्ठ सदस्य प्रेमकुमार द्विवेदी यांचा नातू प्रतिक द्विवेदी,अध्यक्ष दामोदर साहू यांचा मुलगा सुदर्शनशेखर साहू यांना विश्वस्तांचा विरोध असताना संस्थेवर सदस्य म्हणून नेमले होते.तसेच देशमुख याने त्याच्या मेहुणीचा मुलगा शिवम जगताप यालाही संस्थेत प्रोबेशनवर ठेवले आहे.
हे प्रकरण धर्मदाय आयुक्तांसमोर सुनावणीस असताना या संस्थेचे उपाध्यक्ष आत्मानंद मिश्रा यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करीत प्रविणकुमार राऊत यांना पाठबळ दिले आहे.त्यामुळे या प्रकरणाला आता विधायक वळण आले असून पहिल्यांदाच संचालक मंडळात एकोपा निर्माण झाल्याचे दिसत आहे.