

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुढारी कस्तुरी क्लब आयोजित आणि सेन्को गोल्ड प्रस्तुत 'माझ्या आईचं पत्र सापडलं' या अनोख्या पत्रलेखन स्पर्धेसह माय-लेकरांचा सहभाग असलेल्या 'आई : एक सर्वश्रेष्ठ नातं!' या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. जागतिक मातृदिनानिमित्त हा कार्यक्रम मंगळवारी (दि.16) नवी पेठेतील पत्रकार भवन येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आहेत. कार्यक्रमातून आयुष्यातील आईचे महत्त्व उलगडणार आहे. पुढारी कस्तुरी क्लबने महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्याला प्रतिसाद देत महिला-युवतींनी त्यांच्या आईविषयी लिहिलेली शेकडो पत्रे दै. 'पुढारी'च्या कार्यालयात आणून दिली. त्याच पत्रांचा समावेश 'माझ्या आईचं पत्र सापडलं' या आजच्या कार्यक्रमात असणार आहे. याचबरोबर माय-लेकरांना 'आई : एक सर्वश्रेष्ठ नातं! या कार्यक्रमातून एकत्र नृत्य, गाणी व अभिनयातून मातृदिन साजरा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग नोंदविला आहे, त्यांचे बहारदार सादरीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे.
कधी : आज, मंगळवारी
(दि. 16 मे)
स्थळ : पत्रकार भवन, नवी पेठ
वेळ : दुपारी साडेबारा