मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, अ‍ॅडमिशन द्या..!

मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, अ‍ॅडमिशन द्या..!

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय, असे सांगून पिंपरी-चिंचवड आणि बंगळुरू येथील महाविद्यालयात 'अ‍ॅडमिशन' करवून देणार्‍या ठगास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. युनिट चारच्या पथकाने चिंचवड येथे ही कारवाई केली. राहुल राजेंद्र पालांडे (31, रा. चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल पालांडे याने त्याच्या तीन ते चार मोबाईल फोन नंबरपैकी काही नंबरला ट्रू कॉलरवर सीएमओ ऑफिस महाराष्ट्र शासन मुंबई असे सेव्ह केले होते.

त्यामुळे त्याने कोणालाही फोन केल्यास ट्रू कॉलरवर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्याचा भास होत होता. तसेच, पालांडे याने व्हॉट्सअप डीपीवर शासनाचे बोधचिन्ह ठेवले होते. पालांडे सगळ्यांना आपण सरकारी अधिकारी तसेच लोकसेवक असल्याचे भासवित होता. दरम्यान, त्याने शहरातील तसेच बंगळुरूमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन घेऊन देण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

असा आला प्रकार उघडकीस…

दोन दिवसांपूर्वी शहरात एका विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अन्य अनेक मंत्री, शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि बहुसंख्य कॉलेजचे संस्थापक, चालक उपस्थित होते. या विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री कार्यालयातील बडे अधिकारी आणि महाविद्यालय व्यवस्थापनाचे विश्वस्त समोरासमोर आले, तेव्हा सुरुवातीला पालांडे याने केलेल्या फोनवरील विनंतीवरून अ‍ॅडमिशन दिल्याचे समोर आले. मात्र, मंत्रालयातील कोणत्याही अधिकार्‍याने कधीही कोणत्याही कॉलेज व्यवस्थापनाला फोन केला नसल्याचे उघड झाले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी कोणाला शिफारस पत्र दिले का, याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर असे पत्र कोणालाच दिले नसल्याचे उघड झाल्याने पालांडे याने बनावट पत्र तयार करून, लोकांकडून पैसे घेऊन हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन फिर्याद दिली.

त्यानंतर, अवघ्या काही तासांत पालांडे याला अटक केली. न्यायालयाने त्याची 29 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, पालांडे याचे मंत्रालय आणि शहरातील बडे राजकीय नेते, महाविद्यालय व्यवस्थापनातील लोकांशी सातत्याने फोनवरून संभाषण होत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

विद्यार्थ्यांकडून घेतले पैसे

पोलिस तपासात आरोपी पालांडे याने विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे. आरोपीने पुणे, पिंपरी- चिंचवड बंगळुरू येथील महाविद्यालयांत अ‍ॅडमिशन मिळवून देण्यासाठी तो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे भासवत होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

फेसबुकवर नेत्यांबरोबरचे फोटो

राहुल पालांडे यांच्या फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनेक कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबरचे फोटो दिसून येत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news