

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील रब्बी पिकांखालील सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हेक्टर असून त्यापैकी 43 हजार 404 हेक्टरवरील म्हणजे सुमारे 19 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. बारामती, पुरंदर, शिरुर तालुक्यातील पिकांचा पेरा सर्वाधिक झाला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.
रब्बी हंगामातील पिकांखालीी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांचा पेरा होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये ज्वारी 1 लाख 20 हजार हेक्टर, गहू 45 हजार, मका 25 हजार, हरभरा 45 हजार आणि भाजीपाला सुमारे 6 हजार 870 हेक्टर आणि अन्य पिकांसह सुमारे 2 लाख 48 हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे.
त्याद़ृष्टिने बियाणांची 31 हजार 205 क्विंटलइतकी आवश्यकता असून तसे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खाजगी बियाणे कंपन्यांकडून मिळून आत्तापर्यंत 11 हजार 700 क्विंटलइतक्या बियाणांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे. तसेच रब्बीसाठी खतांचाही मुबलक पुरवठा करण्याचे नियोजन करण्या आले असून त्यानुसार पुरवठा सुरु आहे.
महिनाअखेर रब्बी हंगामातील पेरण्यांचा टक्का वाढण्याची अपेक्षा आहे. रब्बी पिकांची तालुकानिहाय झालेली पेरणी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे. हवेली 173, भोर 474, जुन्नर 936, खेड 3663, आंबेगांव 1327, शिरुर 6278, बारामती 16779, इंदापूर 3375, दौंड 1777, पुरंदर 8623 हेक्टरवरील पेरणी पूर्ण झालेली आहे. तर मुळशी, वेल्हे, मावळ तालुक्यातील पेरण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला
नाही. भात काढणी पूर्ण झाल्यानंतर रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा आणि गव्हाची पेरणीस शेतकरी प्राधान्य देतात. चालूवर्षी पाणी उपलब्धता चांगली असल्याने गव्हाचा पेरा वाढण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.