

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबादेवाचा सोमवती यात्रा सोहळा सोमवारी (दि. 20) होणार आहे. सोमवारी अमावास्या दुपारी 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत असून, सकाळी सात वाजता जेजुरीगडावरून श्री खंडोबादेवाचा पालखी सोहळा कर्हास्नानासाठी नदीकडे मार्गस्थ होऊन दुपारी बारा वाजण्याच्या आत श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्तींना कर्हास्नान घातले जाणार असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत देवाचे इनामदार राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.
सोमवती यात्रा व महाशिवरात्र उत्सवाच्या नियोजनानिमित्त जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिर आवारात पालखी सोहळा सामिती व ग्रामस्थांची बैठक झाली. या वेळी पालखी सोहळ्याचे इनामदार राजेंद्र पेशवे, श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ समितीचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, माजी अध्यक्ष गणेश आगलावे, पदाधिकारी अरुण खोमणे, छबन कुदळे, पंडित हरपळे, सुशील राऊत, दीपक राऊत, माणिक पवार, जाफर पानसरे, काशिनाथ मोरे, शैलेश राऊत, रामदास माळवदकर, तसेच श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, सुधीर गोडसे, नितीन राऊत, संदीप घोणे, देवसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, गणेश डिखळे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, अजिंक्य देशमुख, जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पुरोहित शशिकांत सेवेकरी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कर्हा नदीवरील देव अंघोळीच्या धार्मिक विधीनंतर हा पालखी सोहळा जेजुरीत ग्रामदैवत जानाई मंदिरासमोर रात्री आठ वाजेपर्यंत विसावणार असून, रात्री आठनंतर हा पालखी सोहळा श्री खंडोबा मंदिराकडे मार्गस्थ होणार असल्याचे पेशवे यांनी सांगितले. सोमवती यात्रा पालखी सोहळ्यासाठी कर्हा नदीकडे जाणार्या रस्त्याची डागडुजी, भाविकांना अल्पोपाहार, पापनाश तीर्थावर मंडप, जानाईदेवी मंदिरासमोर मंडप आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून, दि. 18 रोजी महाशिवरात्र उत्सवासाठीही सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
महाशिवरात्र उत्सवासाठी गर्दीच्या नियोजनासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सांगितले. शनिवारी व रविवारी महाशिवरात्र उत्सव व सोमवारी (दि. 20) सोमवती यात्रा असून, या तीन दिवसांत जेजुरीगडावर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी भाविकांनी दागदागिने, मौल्यवान वस्तू बरोबर आणू नयेत, असे आवाहन जेजुरी देवसंस्थानचे व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी केले आहे.