पुणे : शाळा सुरू ठेवण्यासाठी बनवाबनवी ! पण प्रत्यक्षात समोर आलं वेगळंच काहीतरी

पुणे : शाळा सुरू ठेवण्यासाठी बनवाबनवी ! पण प्रत्यक्षात समोर आलं वेगळंच काहीतरी
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम पानशेत खोर्‍यातील घिवशी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी नाही, पण शाळा तर सुरू राहिली पाहिजे. मग काय लावली शक्कल. शेजारच्या गावातील विद्यार्थी दररोज घेऊन जाऊन शाळेत एका विद्यार्थ्याची उपस्थिती दाखवली. त्या एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक. प्रत्यक्षात शाळा असलेल्या गावातील एकही विद्यार्थी नाही. ही बाब उघड झाली ती शिक्षणाधिकार्‍यांच्या अचानक झालेल्या भेटीमध्ये.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पानशेत खोर्‍यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांना अचानक भेटी दिल्या. त्यामध्ये शाळा सुरू ठेवण्यासाठी शिक्षकांनी केलेले प्रताप समोर आले आहेत. एका बाजूला शिक्षक कमी असल्याची ओरड जिल्ह्यामध्ये होत आहे. दुसरीकडे मात्र काही शिक्षक कामापासून पळ काढण्यासाठी आणि सोईस्कर ठिकाणासाठी नाना प्रकाराच्या शक्कल लढवत आहेत. त्याचेच हे एक उदाहरण.

घिवशी येथील प्राथमिक शाळेमध्ये शेजारच्या आंबेगावमधील एक विद्यार्थी दररोज आणून त्या विद्यार्थ्याला घिवशीच्या पटसंख्येवर दाखवण्यात आले. आंबेगावमध्ये देखील दोनच विद्यार्थी त्यापैकी एक घिवशीमध्ये. घिवशीमध्ये एक तर आंबेगावध्ये दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे आंबेगावध्ये एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार शिक्षणाधिकार्‍यांना समोरच बघायला मिळाला. शिक्षणाधिकार्‍यांच्या भेटीमध्ये आणखी गावांमधील शाळांबाबत देखील अशीच काहीशी परिस्थिती बघण्यास मिळाली. वडघर गावातील शाळा तीन वाजता आणि शिरकोली, मानगाव येथील शाळा साडे चार वाजता म्हणजेच नियमित शाळेच्या वेळेपूर्वीच शाळेतील विद्यार्थ्यांना सोडण्यात आले होते. हा सगळा प्रकार बघून शिक्षण विभागाकडून याचा अहवाल तयार केला आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन कार्यवाही करणार की, केवळ बघ्याची भूमिका घेऊन इतर ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनापासून वंचित ठेवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा आणखी ही शाळा…?
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा कमी पटसंख्येत सुरू आहेत; परंतु अतिदुर्गम भागातील शाळांच्या गावामध्ये विद्यार्थीच नसल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, असे अनेक गावांमध्ये परिस्थिती असण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करतात. भोर, वेल्हे तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, सर्व शाळांची तपासणी होणे गरजेचे आहे. ज्या भागात शिक्षकांची गरज आहे, त्याठिकाणी शिक्षक उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते.

जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा – 3,638
वीस पटसंख्या
कमी असलेल्या शाळा – 1,058
वीसहून कमी पटसंख्या शाळेतील शिक्षक स्थिती – 7 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक
सर्व शाळेतील शिक्षक स्थिती – 22 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news