सोमयाचे तळे अजून कोरडेच

सोमयाचे तळे अजून कोरडेच

सोमेश्वरनगर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला, तरीही वरुणराजा बरसत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. काही भागांत तर ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पाऊस न झाल्याने सोमेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन सोमयाचे तळे कोरडेठाक पडले आहे.

दरवर्षी हे तळे जून-जुलैमध्ये निम्मे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण भरते. या पाण्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांना वापरण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी व शेतीसाठी होत असतो. दरवर्षी ओव्हरफुल होणारे हे तळे उन्हाळ्यात शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरते. चालू वर्षी मात्र पावसाअभावी हे तळे कोरडेच आहे.

सोमेश्वर मंदिर परिसरात येणार्‍या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात येते. मात्र, समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चालू वर्षी बारामतीच्या पश्चिम भागातील विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे शेतीला पाण्याची टंचाई जाणवत आहे. उपलब्ध पाण्यावर शेतीची तहान भागवली जात आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने तळे कोरडे पडले आहे. सोमेश्वर परिसराला वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. तरीही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या भागातील तळी, विहिरी, ओढे, नाले, चार्‍या पाऊस नसल्याने कोरड्या पडल्या आहेत. पावसाचा अडीच महिन्यांचा कालावधी संपूनही पाऊस झाला नसल्याने पुन्हा जनावरांच्या चार्‍याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news