

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी, तसेच विजेची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य सरकारने सौर कृषी वहिनी योजनेची अंमलबजावणी केली आहे. योजनेमुळे दिवसा वीज मिळण्याबरोबर खासगी मालकी अथवा संस्थांच्या नावावर जमिनी आहेत. अशांना वार्षिक उत्पन्न मिळविण्याची संधी मिळणार आहे. पुरंदरमध्ये मात्र या योजनेची पुरेपूर माहिती नसल्यामुळे जनजागृतीची आवश्यकता भासत आहे.
मुख्यमंत्री कृषी वहिनी योजनेची सन 2017 रोजी सुरुवात करण्यात आली आहे. 10 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा होणार आहे. प्रकल्पासाठी 50 एकरांपर्यंत प्रतिवर्ष 30 हजार रुपये प्रतिएकर जागा भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यामध्ये तीन टक्के प्रतिवर्षी भाडेवाढही होणार आहे. स्वतः शेतकरी, शेतकर्यांचा गट, सहकारी संस्था, साखर कारखाने, केंद्र व राज्य सरकारच्या विविध संस्था, कंपन्या, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, प्रशासकीय संस्था, नागरी व स्थानिक स्वराज्य संस्था व इतर हक्केदाराच्या जमिनी मालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
पुरंदर तालुक्यातील केवळ तीन ते चार गावांनी योजनेसाठी महावितरणकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याचे समजते. मुख्य केंद्र, उपकेंद्र व त्या अंतर्गत येणार्या गावांमध्ये या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येत आहे. महावितरणने योजनेबाबत गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे.