Pune Garbage Issue
पुणे: ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत पुणे महानगरपालिकेला राज्यात दुसरा, तर देशात आठवा क्रमांक मिळाला. मात्र, शहरातील कचर्याचा प्रश्न कायम आहे. सोसायट्यांमधील कचरा गोळा करण्याची जबाबदारी ‘स्वच्छ’ संस्थेला दिली असतानादेखील रोजच्या रोज कचरा उचलला जात नसल्याने सोसायट्यांसमोर असलेल्या कचरापेट्या तुंबल्या आहेत.
परिणामी, रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. उपनगर आणि समाविष्ट गावांत रस्त्याच्या दुतर्फा हा कचरा पडून असल्याने याचा त्रास येणार्या जणार्यांना सहन करावा लागत आहे. (Latest Pune News)
‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’चा पुणे महानगरपालिकेमार्फत ढोल बडवला जातो. मात्र, पुणे शहरासह उपनगरांत पालिकेच्या घंटागाड्यांमार्फत कचरा उचलला जात नाही. पुण्यात नव्याने दाखल झालेल्या गावांत तर कचर्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुस, म्हाळुंगे, बाणेर, पाषाण, वडगाव, धायरी आदी परिसरात कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत व पुणे महानगर पालिकेमार्फत शहरातील कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेमार्फत सोसायट्यांमधील कचरा गोळा केला जातो. त्यांच्या गाड्या या सोसायट्यांत जाऊन कचरा गोळा करत असतात.
मात्र, पुण्यात काही मोजक्याच ठिकाणी या गाड्या फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या गाड्या दोन ते चार दिवस येत नसल्याने सोसायट्यांतील कचरा पडून राहतो. कचराकुंड्या रोजच्या रोज रिकाम्या होत नसल्याने हा कचरा रस्त्यावर फेकून दिले जातो. उपनगरांत व समाविष्ट गावांतील रस्त्याच्या कडेला यामुळे जागोजागी कचरा पडून असल्याचे दिसून येते.
...म्हणून कचरा पडून राहतो
महापालिकेच्या स्वच्छ एजन्सीमार्फत अनेक घंटागाड्या शहरात सोसायट्यांतील कचरा उचलण्यासाठी फिरतात. कचरा गोळा करण्यासाठी एका फ्लॅटमागे 80 रुपये घेतले जातात. पाषाण, बाणेर, सुस परिसरात, 70 ते 80 फ्लॅट असलेल्या सोसायट्यांकडून महिन्याला कचरा उचलण्यासाठी तब्बल 6 ते 7 हजार रुपये घेतले जातात. हा कचरा रोज उचलून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र, या घंटागाड्या दोन ते तीन दिवसांनी येत असल्याने कचरा तसाच पडून राहत आहे.
पुणे महापालिका आमच्याकडून मोठ्या प्रमाणात टॅक्स वसूल करत असते. त्यामुळे कचरा उचलण्याची व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेची आहे. हा कचरा मोफत उचलणे अपेक्षित आहे. पण, यासाठी पैसे मोजावे लागतात, हे चुकीचे आहे. याचा पालिकेने विचार करायला हवा.
- आकाश पाटील, अध्यक्ष, किरण समृद्धी हाउसिंग सोसायटी.
पुण्यातील नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत कचरा उचलला जाणे अपेक्षित आहे. यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. कचरा उचलला जात नसल्यास, महापालिकेच्या अधिकार्यांकडून तसेच कर्मचार्यांकडून संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- संदीप कदम, प्रमुख घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.