

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभासाठी हयातीचा आणि उत्पन्नाचा दाखला जमा करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना दाखला मिळावा यासाठी प्रशासनाने शिबिरे घेतली. तरीही ऑगस्टअखेर जिल्ह्यातील सुमारे 40 हजार लाभार्थ्यांनी दाखले सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अनुदान मिळणार की, नाही याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांत एकूण 83 हजार 837 लाभार्थी आहेत. त्यापैकी 44 हजार 286 लाभार्थ्यांनी हयातीचा व उत्पन्नाचा दाखला सादर केला. तर 39 हजार 551 लाभार्थ्यांनी दाखले जमा केलेले नाहीत. यामध्ये पुणे शहरातील 7 हजार 751 लाभार्थ्यांपैकी सर्वाधिक 4 हजार 926, भोर तालुक्यातील 4 हजार 479 तर हवेली तालुक्यातील 4 हजार 272 लाभार्थ्यांनी दाखला सादर केलेला नाही.
लाभार्थ्यांना हयातीचा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे प्रत्येक तालुक्यात किमान चार ते 9 शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मात्र, त्या शिबिरांना लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती देण्यात आली. दाखले जमा करण्यासाठी 31 ऑगस्टची ही शेवटची मुदत होती. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतर दाखले जमा न करणार्या लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्याबाबतचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली.