आरोग्यासाठी लंघन ठरते फायदेशीर; तज्ज्ञांचे मत

आरोग्यासाठी लंघन ठरते फायदेशीर; तज्ज्ञांचे मत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लंघन करा आणि पोटाचे आरोग्य सांभाळा, असे जाणते लोक पूर्वी सांगत. तेच आता तज्ज्ञ सांगत आहेत. उपवास केल्याने पोटाच्या सर्व समस्या नाहीशा होतात. त्यामुळे उपवास करणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सहा मे हा दिवस आंतरराष्ट्रीय उपवास दिवस म्हणून साजरा केला जातो. आयुर्वेदाच्या भाषेत उपवासाला 'लंघन' संबोधले आहे. लंघन केल्याने आतड्यांत पाचक रसाची निर्मिती होते. पोटाला आराम मिळतो. शरीर हलके होते. त्यामुळे या दिनाचे विशेष महत्त्व असून, सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. 'लंघन' शब्दाचा अर्थ शरीर हलके करणे. लंघनाने चपळाई येते. भूक लागली तरच जेवा. भूक लागली तरच आपणाला जेवण करणे गरजेचे आहे.

पोटाला आरामाची गरज…

आपण दिवसातील दहा ते बारा तास सतत खात असतो. त्यामुळे पोटाची पचनक्रिया चोवीस तास सुरू असते. पोटातील यंत्रणेला आरामच मिळत नाही. त्यामुळे विविध विकारांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, यांसारखे आजार भारतासह जगभरात डोकेदुखीचा विषय ठरले आहेत. यातून सुटका पाहिजे असेल, तर भारतीय आयुर्वेदाने सांगितलेले लंघन म्हणजेच उपवास महत्त्वाचा ठरतो.

सायंकाळी हलका आहार घ्या

आपल्या देशात सर्वच धर्मांमध्ये उपवासाचे महत्त्व सांगितले आहे. त्यातूनच विविध सणवार, उत्सवात उपवास धरण्याची पद्धत लागू झाली. त्यामागे पोटाला लंघन घडणे हाच उद्देश आहे. उपवासाच्या दिवशी अत्यंत हलका आहार घेणे महत्त्वाचे असूनसुद्धा आपण साबूदाण्याचे विविध प्रकार जास्त खातो. मात्र, पोटात उपवासाच्या दिवशी अतिशय कमी आहार घेतला पाहिजे. त्यामुळे पोटाला त्यादिवशी आराम मिळून पाचक रसांची निर्मिती होण्यास मदत होते.

लंघन आठवड्यातून एकदा केले पाहिजे. पचनक्रियेला विश्रांती न दिल्याने अग्नी मंदावतो. तो प्रदीप्त करण्यासाठी लंघन गरजेचे आहे. लंघन म्हणजे पूर्ण उपवास. त्यामध्ये फलाहार, दूध किंवा काहीच न खाणे, हे अपेक्षित आहे. अशक्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी लंघन करू नये. लंघन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि अनेक आजार बरे होतात.
                                        – डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news