

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आणि कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये कौशल्य केंद्र (स्किल सेंटर) सुरू केले जाणार आहे. दोन्ही आयटीआय मिळून अंदाजे 19 अल्प कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मल्टिस्किल शिकता येणार आहे. तसेच, रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत. महापालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआयमध्ये 14 ट्रेड शिकविले जातात. तर, कासारवाडी येथील महिला आयटीआयमध्ये 6 ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते. मोरवाडीतील आयटीआयमध्ये सुमारे 500 जागांवर दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तथापि, प्लंबर, शीटमेटल वर्कर या जागांना कमी मागणी असल्याने जवळपास 40 जागा शिल्लक राहतात.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी अशा दोन्ही आयटीआयमध्ये स्किल सेंटर सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून मान्यता घेतली जाणार आहे. प्रत्येक अभ्यासक्रमाचा साधारण 100 ते 300 तास असा कालावधी असणार आहे.
आयुक्तांची मंजुरी
महापालिकेच्या मोरवाडी आणि कासारवाडी अशा दोन्ही आयटीआयमध्ये स्किल सेंटर सुरू करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे. या आयटीआयमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा वापर करूनच हे कोर्सेस शिकविले जाणार आहेत.
विविध अभ्यासक्रमांचा समावेश
मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, आयटी तंत्रज्ञानाशी संबंधित असे विविध अल्प कालावधीचे कोर्सेस स्किल सेंटरमार्फत सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी स्किल इंडियाच्या पोर्टलवर ऑनलाइन स्वरुपात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. स्किल इंडियाच्या पोर्टलवरुन याविषयी परवानगी मिळाल्यानंतर हे कोर्सेस सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.
मोरवाडी आणि कासारवाडी आयटीआयमध्ये अल्प कालावधीचे अंदाजे 19 कोर्सेस सुरू करता येणार आहे. त्यामध्ये वाढही होऊ शकते. विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून विविध कोर्स करून मल्टिस्किल शिक्षण घेता येणार आहे. त्यांना शासनाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. कोर्स शिकणार्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
– शशिकांत पाटील, प्राचार्य, महापालिका आयटीआय, मोरवाडी.