

खडकवासला: उन्हाची वाढती तीवता आणि भीषण वणव्यांमुळे जंगलातील नैसर्गिक चारा व खाद्य नष्ट झाले आहे. परिणामी, सिंहगड, पानशेतच्या जंगलातील वन्यजीवांची पाण्यासाठी प्रचंड वणवण सुरू आहे. त्यांची पाण्यासाठी होणारी तगमग ओळखून वन विभागाच्या वतीने सिंहगडच्या जंगलातील विविध ठिकाणच्या सहा पाण्याच्या तळ्यांमध्ये पाण्याची विशेष सोय केली आहे.
कडकडीत उन्हामुळे जंगलातील बहुतांश नैसर्गिक झरे आणि पारंपरिक पाणवठे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा शोध घेत मोर, ससे, हरिण, काळवीट आदी वन्यजीव नागरी वस्त्यांच्या परिसरात, तसेच खडकवासला आणि पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धाव घेत आहेत. वन्यजीवांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबून त्यांची तहान भागविण्यासाठी वन विभाग आणि स्थानिक समित्या सरसावल्या आहेत.
घेरा सिंहगड संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने सिंहगड किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या थोपटेवाडी (ता. हवेली) परिसरातील शिवकालीन काळूबाई जंगलातील दोन तळ्यांमध्ये सध्या टँकरने पाणी सोडले जात आहे. आतकरवाडी येथील दोन आणि सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील तळई उद्यान परिसरातील दोन तळ्यांमध्येही नियमितपणे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्व वनतळ्यांमध्ये दर आठवड्याला प्रत्येकी 2 ते 3 टँकर पाणी सोडले जात आहे. एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत जवळपास 100 टँकर पाणी या तळ्यांमध्ये सोडले आहे.
निधीअभावी नवीन तळ्याचे प्रस्ताव प्रलंबित
वन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी वन क्षेत्रात नवीन तळी किंवा पाणवठे तयार करता आलेले नाहीत. सिंहगडच्या जंगलातील तळ्यांमध्ये पाणी टाकण्यासाठी लागणारा खर्च सध्या घेरा सिंहगड संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या आर्थिक निधीतून केला जात आहे. दरम्यान, सिंहगडच्या जंगलात नवीन वनतळी निर्माण करण्याचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.
वन्यजीवांसाठी वन विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तळ्यांमध्ये सध्या दर आठ ते दहा दिवसांनी टँकरने पाणी सोडले जात आहे. यामुळे वन्यप्राण्यांसह पक्ष्यांची तहान भागण्यास मोठी मदत होत आहे. सिंहगडच्या जंगलात बिबट्यासह विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा आणि दुर्मीळ पक्ष्यांचा अधिवास आहे, त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
समाधान पाटील, वन परिमंडळ अधिकारी, सिंहगड वन विभाग