

पुणे : मोबाइल न विचारता वापरल्याने झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. ही घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी भागात घडली. गुन्हा घडल्यानंतर तीन तासांत नांदेड सिटी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून,त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे. देवा उर्फ देवीदास पालते (वय 25, रा. तागयाल, ता. मुखेड, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. (Pune News Update)
याप्रकरणी, गजानन हरिश्चंद्र राठोड (वय 32, रा. आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ), महारुद्र शिवाजी गवते (वय 27, रा. साईधाम, त्रिनेत्र इंजिनिअरिंगजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर दिनेश राठोड हा फरार असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर यांनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 27 जुलै रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास धायरी येथील त्रिनेत्र इंजिनिअरिंग कंपनीच्या वरील महिल्या मजल्यावर घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेला तरुण पालते, गजानन राठोड, दिनेश राठोड आणि गवते हे कामगार आहेत. रोजंदारीवर हे रंगकाम करण्याचे काम करतात. एका ठेकेदारामार्फत काम करत असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्रिनेत्र इंजिनिअरिंग कंपनीच्या वरील मजल्यावरील एका रिकाम्या खोलीत चौघे राहत होते. पालते याच्याकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे तो खोलीतील कोणाचा तरी मोबाईल मागून घेत असे. 27 जुलै रोजी चौघेजण दारू पिले होते. पालते याने गजाननचा मोबाईल घेतला. त्या कारणातून पालते आणि त्यांच्यात वाद झाला. गजानन व त्याच्या साथीदारांनी पालते याला बेदम मारहाण केली. डोक्यात मारहाण करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. रात्रभर पालते तसाच खोलीत पडून होता. दुसर्या दिवशी सकाळी एकाने सिंहगडरोड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पालते याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाइल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करून खून केल्याची कबुली दिली.
गजानन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, प्रवीण जाधव, संग्राम शिनगारे, राजू वेगरे, प्रतीक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भीमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, निलेश कुलथे यांनी ही कामगिरी केली.