मुंढवा: नवीन मुळा-मुठा कालव्याची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. या कालव्याची दुरुस्ती करताना खोल पाया खोदून काँक्रिटीकरणाची किंवा दगडी भिंत बांधणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने एम्प्रेस गार्डन ते हडपसर यादरम्यान कालवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एम्प्रेस गार्डन, सोपानबाग, बी. टी. कवडे रस्ता, शिंदे वस्ती, वैदुवाडी आणि पुढे फुरसुंगीपर्यंत नव्या कालव्याचा भराव अनेक ठिकाणी खचला आहे. काही ठिकाणी कालवा कधीही फुटू शकतो, अशी स्थिती आहे. (Latest Pune News)
मागील काही वर्षांपूर्वी एम्प्रेस गार्डनच्या शेजारी नवा कालवा फुटला होता. सुदैवाने या ठिकाणी ओढा असल्याने कालव्याचे पाणी नदीकडे वाहून गेले होते. कालव्याच्या दुरुस्तीसाठी टाळाटाळ करून कालवा पुन्हा फुटण्याची वाट पाटबंधारे प्रशासन पहात आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद आहे. पुढील काही दिवसांत तो पुन्हा सुरू होईल. दरम्यानच्या काळात ज्या ठिकाणी कालव्याच्या भरावराची दुरवस्था झाली आहे, त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाने दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
खचलेला पूल कोसळण्याचा धोका
क्रोम मॉल चौक ते बी. टी. कवडे रोड दरम्यानच्या रस्त्यावर असलेला कालव्यावरील पूल मागील दोन वर्षांपासून खचलेल्या स्थितीत आहे. तो दिवसेंदिवस आणखी खचत चालला आहे. तो केव्हाही कोसळण्याचा धोका आहे. या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने पूल कोसळला, तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जागा पालिकेकडे हस्तांतरित होणार
खडकवासला धरण ते कात्रजमार्गे फुरसुंगीपर्यंत भूमिगत पाईपलाईन टाकून नवीन कालवा पुढे प्रवाहित करण्याचे काम नियोजित आहे. त्यामुळे खडकवासला ते स्वारगेट आणि पुढे हडपसर फुरसुंगीपर्यंत नवीन कालव्याचा प्रवाह पूर्ण बंद होणार असून ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. त्या जागेचा काय उपयोग करायचा हा निर्णय महापालिका प्रशासन घेणार आहे, असे पाटबंधारे विभागातील अधिकार्यांनी सांगितले.
नवीन कालव्याच्या भराव दुरुस्तीसाठी सध्या निधी उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे, तिथे दुरुस्ती केली जात आहे.
-वीरेश राऊत, हडपसर शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग