वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मान्सूनची चाहूल लागल्याने तसेच सलग सुट्यामुळेे सिंहगड पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. राजगड, तोरणागडावरही गर्दी होती. वन विभागाने नियोजन केल्याने मोठ्या संख्येने वाहतूक वाढूनही सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली नाही. मात्र, डोणजे गाव तसेच खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. येथे हवेली पोलिस वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी धावपळ करीत होते. सिंहगडावर शिवराज्याभिषेक सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती.
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. पावसाची पर्वा न करता भिजत पर्यटक गडावर धाव होते. घाट रस्त्यावर वाहतूक वाढल्याने वनरक्षक बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी, नितीन गोळे, शांताराम लांघे, रमेश खामकर आदींसह सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागली.
वाहनतळापासून दोन्ही बाजूच्या घाट रस्त्यावर वाहतूक नियोजन केल्याने वाहतूक बंद करावी लागली नाही. दिवसभरात गडावर पर्यटकांची 5000 चारचाकी व 700 दुचाकी वाहने गेली. डोणजे गावातील एका वॉटरपार्कसमोर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांचे हाल झाले. पोलिसांनी धाव घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली.
उन्हाची तीव्रता कमी होऊन थंडगार वारे वाहत आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या रविवारच्या तुलनेत या रविवारी सिंहगडासह राजगड, तोरणा, पानशेत परिसरात पर्यटकांची संख्या जवळपास दुपटीने वाढली होती.